स्वयंप्रेरणेतून दोन शिक्षकांनी केला लोधीटोला शाळेचा कायापालट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:28+5:302021-03-04T04:55:28+5:30
तिरोडा : नगरपरिषद किंवा जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की शिक्षकांनी केवळ शाळेच्या वेेळेवर येऊन शैक्षणिक कार्य करुन घरी जाणे ...
तिरोडा : नगरपरिषद किंवा जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की शिक्षकांनी केवळ शाळेच्या वेेळेवर येऊन शैक्षणिक कार्य करुन घरी जाणे एवढेच समजले जाते. हा समज तिरोडा नगरपरिषदेच्या लोधीटोला येथील राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी खोटा ठरविला. त्यांनी स्वयंप्रेरणेने स्वखर्चातून शाळेची रंगरंगोटी करुन विद्यार्थी व पालकांना शाळेकडे आकर्षित केले. तसेच पर्यावरण स्वच्छता, भाजीपाला, प्राणी व पक्षी यांची ओळख व्हावी म्हणून सुंदर चित्रे रेखाटून आपली वेगळी ओळखही करवून दिली. शहरात शिक्षण घेण्यासाठी जाणारे गावातील विद्यार्थी परत शाळेत आल्याने शाळेची पटसंख्या वाढली असून पालकांचा विश्वास संपादन केल्याने पालकांनीही आपली मुले याच शाळेत शिकविण्याचा निर्णय घेतला आहे.
तिरोडा नगरपरिषद अंतर्गत लोधीटोला गावात राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा असून या शाळेत १ ते ५ पर्यंत वर्ग आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी चौधरी व सहायक शिक्षक केसराम लांजेवार यांनी शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यामुळे या गावातील विद्यार्थी शाळेकडे आकृष्ट झाले असून त्यांना शाळेत शैक्षणिक साहित्य मिळत आहे. नीटनेटकेपणा सोबतच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळेची पटसंख्या वाढविणे तसेच शाळेत प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे यासाठी स्वयंप्रेरणेने त्यांनी शाळेची रंगरंगोटी केली. या शाळेत पालकांच्या मागणीवरुन इंग्रजीचा वर्गही सुरू केला. येथील विद्यार्थी शिक्षणाकरिता दीड किलोमीटर अंतरावरील तिरोडा येथील खासगी शाळेत जात होते. मात्र मुख्याध्यापिका चौधरी व शिक्षक लांजेवार यांनी स्वखर्चातून संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करुन शाळा परिसर स्वच्छ केला.
तसेच विद्यार्थ्यांना भाजीपाला, फळे, निसर्ग, पर्यावरण संरक्षण, पशुपक्षी यांची ओळख व्हावी म्हणून भिंतीवर फळे, फुले, भाजीपाला, पशुपक्षी यांची चित्रे काढून शाळेचा कायापालट केला. इतकेच नव्हे तर शाळेच्या स्वच्छतेकडेही लक्ष पुरविले. या दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी व शिक्षणाचे महत्त्व सांगून आदर्श विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर व नगरसेवकांनी शाळेला भेट देऊन शिक्षकांनी केलेल्या या कामांचे तोंड भरुन कौतुक केले.