दोन हजार मोजले पण गुरुजींना ऑनलाईन प्रशिक्षणाचा मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2022 05:00 AM2022-06-12T05:00:00+5:302022-06-12T05:00:15+5:30
हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्याने सातत्याने अडथळे येत आहेत. परिणामी, शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रशिक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २२८० हून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी दोन हजार रुपये शुल्कही घेतले जाते; मात्र बहुतांश जणांना युजर आयडी, पासवर्ड मिळाला नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे दोन हजार रुपये मोजून गुरुजींना ‘ऑनलाइन प्रशिक्षणाचा’ मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नोकरीची १२ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ तर २४ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणीसंदर्भात दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्रशिक्षण दिले जाते. यासाठी दोन हजार रुपये शुल्क घेतले जात असून, प्रशिक्षणाला १ जूनपासून सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्याने सातत्याने अडथळे येत आहेत. परिणामी, शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रशिक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २२८० हून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी दोन हजार रुपये शुल्कही घेतले जाते; मात्र बहुतांश जणांना युजर आयडी, पासवर्ड मिळाला नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे दोन हजार रुपये मोजून गुरुजींना ‘ऑनलाइन प्रशिक्षणाचा’ मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेकांना युजर आयडी, पासवर्ड मिळालाच नाही
- शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडे १२ व २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना नोंदणी करावी लागते. ४५ दिवसांचे प्रशिक्षण राहते. यामध्ये दररोज अर्धा तास ऑनलाइन माहिती दिली जाते.
- बहुतांश शिक्षकांना युजर आयडी, पासवर्ड मिळालेला नाही. तर अनेकांनी चुकीचा पत्ता दिला असल्याने गैरसोय होत आहे. अनेक घोळामुळे शिक्षकांचा मनस्ताप वाढला आहे.
उत्तरे, व्हिडिओ अपलोड होईना
अर्धा तासाच्या प्रशिक्षणानंतर प्रश्नोत्तरे तसेच व्हिडिओद्वारे माहिती दिली जाते. मात्र, तीही वेळेवर अपलोड होत नसल्याची शिक्षकांची ओरड आहे. याबाबत विचारणा करूनही सुधारणा होत नाही.
वेबसाईट वारंवार पडतेय बंद
प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी वेबसाइट बंद पडल्याचे संबंधित शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे ४५ दिवसांत प्रशिक्षण पूर्ण होणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
प्रशिक्षण पूर्ण कसे होणार?
- ४५ दिवसांचे हे प्रशिक्षण असते. १२ व २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना याद्वारे माहिती दिली जाते; मात्र वारंवार ऑनलाइन अडचणी येत असल्याने हे प्रशिक्षण वेळेत पूर्ण होणार का, असा सवाल शिक्षकांकडून होत आहे.
ऑफलाईन प्रशिक्षण का नाही?
- कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑफलाइन प्रशिक्षण बंद आहे. त्यामुळे ऑनलाइनचा पर्याय आहे.
- आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असल्याने ऑफलाइन प्रशिक्षण देण्याची मागणी आहे.
७० टक्के प्रशिक्षण पूर्ण
गोंदिया जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून, दररोज अर्धा तास प्रशिक्षण घेतले जात आहे. १२ व २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांचा यामध्ये समावेश असल्याचे शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.