झेडपी सभापती निवडणुकीत टू बाय टू पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:23 PM2018-01-22T22:23:56+5:302018-01-22T22:25:35+5:30
जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने समविचारी पक्षासोबत आघाडी न करता भाजपासोबत अभद्र युती करुन जि. प. मध्ये सत्ता स्थापन केली.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने समविचारी पक्षासोबत आघाडी न करता भाजपासोबत अभद्र युती करुन जि. प. मध्ये सत्ता स्थापन केली. आता ३० जानेवारीला विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सुध्दा हेच समीकरण कायम राहणार आहे. एकूण चार सभापती पदांपैकी दोन काँग्रेस व दोन भाजपाकडे जाणार आहे. त्यामुळे झेडपीत हातात कमळानंतर आता टू बाय टू चा पॅटर्न चालणार आहे.
राज्यातच नव्हे तर देशभरात भाजप विरुध्द काँग्रेस असे चित्र असताना गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसने भाजपासोबत अभद्र युती करुन जि.प.मध्ये सत्ता स्थापन केली. काँग्रेसचे १६ आणि राष्टÑवादी काँग्रेसचे २० सदस्य असे संख्याबळ जि. प. मध्ये आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सहजपणे सत्ता स्थापन करु शकले असते. मात्र लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीपासून या दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. तो अद्यापही कायम आहे.
त्यामुळे राष्टÑवादी काँग्रेससोबत आघाडी करुन जि.प.मध्ये सहज सत्ता स्थापन करणे शक्य असताना केवळ राष्टÑवादी काँग्रेसला जि.प.तील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपासोबत अभद्र युती करुन सत्ता स्थापन केल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. या निवडणुकीदरम्यान केवळ तत्वांसाठी निष्ठा बाजुला ठेवल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर आता ३० जानेवारीला जि. प. च्या महिला व बालकल्याण, समाज कल्याण, कृषी व शिक्षण सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेस व भाजपाच्या जि. प. सदस्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डींग लावली आहे. काँग्रेस व भाजपच्या जि.प.तील फार्म्युल्यानुसार दोन सभापती पदे काँग्रेस व दोन सभापती पदे भाजपाकडे जाणार आहेत. सभापतीपदासाठी रमेश अंबुले, लता दोनोडे, सरिता कापगते, माधुरी कुमरे, गिरीष पालीवाल, रजनी कुंभरे, मंदा कुंभरे, विश्वजीत डोंगरे, शोभेलाल कटरे यांची नावे सध्या चर्चेत आहे. एकूण पदे चार आणि त्यासाठी दावेदार दहा ते बारा असल्याने दोन्हीे पक्ष्यांचे स्थानिक नेते यावर कुठला तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजुर्नी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा आणि गोरेगाव या तालुक्यातील सदस्यांचा सभापतीपदासाठी प्राधान्याने विचार केला जाणार असून जवळपास चार नावे देखील निश्चित झाल्याचे बोलल्या जाते. मात्र नावे आत्ताच जाहीर केल्यास काही सदस्य दुखावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३० जानेवारीला ती जाहीर केली जाणार आहे.
झेडपी पॅटर्नचे दिल्ली दरबारी पडसाद
जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपासोबत अभद्र युती करुन सत्ता स्थापन केली. याचे पडसाद दिल्ली दरबारी उमटले असून पक्ष श्रेष्ठींनी याची दखल घेतल्याची माहिती आहे. या अभद्र युतीमुळे काही निष्ठावान कार्यकर्ते दुखावले असून त्यांनी आपली नाराजी वरिष्ठांजवळ व्यक्त केल्याचे बोलल्या. त्यामुळे पक्ष श्रेष्ठी याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
भाजपचे कार्यकर्तेही नाराज
जि.प.मध्ये काँग्रेसपेक्षा भाजपाचे संख्याबळ अधिक असताना भाजपाने अध्यक्षपद काँग्रेसला दिले. तर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान अभद्र युती केल्याने भाजपचा एक स्थानिक नेता व काही कार्यकर्ते दुखावले आहेत. काही कार्यकर्त्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान ही नाराजी देखील बोलून दाखविली होती. मात्र मुंबईतून आदेश असल्याने कुणाचेच चालले नाही.