साहित्य चोरणाऱ्या दोघांना कोर्टात; बसण्याची शिक्षा, २०० रुपये दंड
By नरेश रहिले | Published: June 3, 2024 07:36 PM2024-06-03T19:36:10+5:302024-06-03T19:36:25+5:30
प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आमगाव यांचा निर्णय
नरेश रहिले
गोंदिया: सालेकसाच्या गडमाता पहाडीजवळील रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी आणलेल्या साहित्यातून काही साहित्य चोरी करतांना रंगेहात पकडलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना २०० रूपये दंड व न्यायालयाचा वेळ संपेपर्यंत आरोपींना न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. ही सुनावणी आमगावच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल जोशी यांनी केली आहे. भादंविचे कलम ३७९, ५११ मध्ये ही सुनावणी केली आहे.
सालेकसाच्या गडमाता पहाडीजवळ राहणारे सुरजकुमारसिंह सुरेशसिंह भारद्वाज (३१) यांच्या पि. व्ही. आर. ई. सी.पी.एल. या कंपनीचे देखरेखित सुरु असलेल्या गडमाता पहाडी जवळील सोनारटोला रेल्वे फाटकच्या मधात रेल्वेच्या रुळावरील पूल क्रमांक २२५ चे बांधकाम करण्याकरिता ठेवण्यात आलेले १० एम. एम.चे ४ क्विंटल लोखंडी सलाखापैकी १ नग लोखंडी सलाख १० एम. एम. ची कींमत ४०० रूपयाचा माल आरोपी सोमेश्वर जयलाल कटरे (३२) व धनलाल सुकलाल कटरे (६५) दोन्ही रा. दरबडा ता.सालेकसा हे दोन्ही २३ मे रोजी दुपारी ३ वाजता चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना मिळून आला.
सालेकसा पोलिसांनी भादंविचे कलम ३७९, ५११ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ३ जून रोजी कलम ३७९, ५११ मध्ये २०० रुपये दंड व न्यायालयाचा वेळ संपेपर्यंत न्यायालयातच बसून राहण्याची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नारायण खांडवाहे यांनी केला. न्यायालयात सरकारी वकील रंगारी यांनी सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी सहाय्यक फौजदार फुंडे, महिला पोलीस शिपाई बहेकार यांनी काम पाहिले.