सख्ख्या जावांच्या उमेदवारीने निवडणुकीत कमालीची रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 02:39 PM2021-12-16T14:39:33+5:302021-12-16T14:45:10+5:30

पट्टीच्या राजकारणी घरण्यातील दोन सख्ख्या जावा परस्परविरोधात राजकीय सारिपाटात दंड थोपटून उभ्या आहेत. यामुळे नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक प्रतिष्ठेची होऊन अतिशय चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

two women candidates from the same family facing zp election war | सख्ख्या जावांच्या उमेदवारीने निवडणुकीत कमालीची रंगत

सख्ख्या जावांच्या उमेदवारीने निवडणुकीत कमालीची रंगत

googlenewsNext
ठळक मुद्देनवेगावबांध जि.प. क्षेत्र : सहा उमेदवार रिंगणात

गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्राकडे समस्त तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, पट्टीच्या राजकारणी घरण्यातील दोन सख्ख्या जावा परस्परविरोधात राजकीय सारिपाटात दंड थोपटून उभ्या आहेत. यामुळे नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक प्रतिष्ठेची होऊन अतिशय चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय उद्यान असलेल्या नवेगावबांधचे विविध नावारूपाने अवलौकिक पात्र आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या जिल्हा परिषद क्षेत्रावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. यावेळी जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ११ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले होते. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. वर-वर पाहता बंडखोरी दिसत नाही. निवडणूक रिंगणात असलेल्यांमध्ये काँग्रेसच्या रूपलता देवाजी कापगते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोकपाल गहाणे, भाजपच्या रचना चामेश्वर गहाणे, बसपच्या सुषमा यशवंतराव बोरकर, वंचित बहुजन आघाडीच्या सुशीला दिलेश्वर राऊत, शिवसेनेच्या योगिता सुनील सांगोळकर यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या ठिकाणी एकाही अपक्ष व बंडखोराचा शिरकाव दिसत नसला तरी सहा मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार भरीसभर दंड थोपटून उभे आहेत.

दोन जावांच्या उमेदवारीने चुरस

एकाच प्रतिष्ठित घराण्यातील दोन सख्ख्या जावांनी राजकीय सारिपाटात दंड थोपटल्याने या क्षेत्रात कमालीची चुरस वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे. थोरल्या जाऊबाई भाजपकडून, तर धाकट्या जाऊबाई राष्ट्रवादीकडून आपले राजकीय भवितव्य अजमावीत आहेत. प्रदेश भाजपच्या पदाधिकारी व माजी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेले लोकपाल गहाणे यांच्या सौभाग्यवती नंदा गहाणे या दोन जावांच्या उमेदवारीने तालुक्याच्या राजकीय गोटात खमंग चर्चा रंगली आहे.

निवडणुकीच्या चौसरात कोणती जाऊबाई वरचढ ठरते याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. उमेदवारी करून सुद्धा एका जाऊबाईला आकाश-पाताळ एक करावे लागले. पक्षांतर्गत विरोधही सहन करावा लागला. आजही उमेदवारीवरून कमालीचा अंतर्गत विरोधाभास दिसतो. रुसव्या-फुगव्याची झळ कोणत्या जाऊबाईला पोहोचते हे वेळच सांगेल. या दोन जाऊबाईच्या उमेदवारीने प्रचारसुद्धा उच्च पराकोटीचाच होईल. दोघींनाही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. तूर्तास दोन जावांच्या लढाईत थोरली की धाकटी जाऊबाई वरचरढ ठरते हे मतदानामधूनच कळेल.

Web Title: two women candidates from the same family facing zp election war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.