दोन वर्षे लोटूनही ७८१ विहिरी अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:21 AM2018-10-27T00:21:50+5:302018-10-27T00:24:05+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अहिल्यादेवी सिंचन कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात प्रत्येकी ७५० असे दोन वर्षाच्या १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अहिल्यादेवी सिंचन कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात प्रत्येकी ७५० असे दोन वर्षाच्या १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही हे उद्दिष्ट गाठण्यात संबंधित विभागाला अपयश आले आहे. आत्तापर्यंत केवळ ७१९ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले असून ८७१ विहिरीची कामे अद्यापही अपूर्ण आहेत.
जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरींच्या कार्यक्रमात दोन वर्षात १५०० विहिरी तयार करायच्या होत्या. यापैकी १४७१ सिंचन विहिरींना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. यातील ११९५ विहिरींचे काम सुरू करण्यात आले. यातील ७१९ विहिरींचे कामे पूर्ण करण्यात आली. या दोन वर्षात आमगाव तालुक्यातील २५०, अर्जुनी-मोरगाव ३००, गोरेगाव २७०, देवरी २००, गोंदिया २००, तिरोडा १६०, सालेकसा ७० व सडक-अर्जुनी ५० विहिरींचे उद्दीष्ट देण्यात आले होते.
जिल्ह्यात पहिल्या वर्षी २०१६-१७ मध्ये २६३, सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात २७९ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. तर ४०४ विहिरीची कामे प्रगतीपथावर आहे. यात आमगाव ५६, अर्जुनी मोरगाव ७०, देवरी ३०, गोंदिया ५३, गोरेगाव ११०, सालेकसा व तिरोडा प्रत्येकी ३९, सडक-अर्जुनी ७ विहिरींचा समावेश आहे.
अहिल्यादेवी सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांसाठी त्यांच्या सातबारावर आधीची विहिरीची नोंदणी नसल्यास तसेच तलाठी यांच्या स्वाक्षरीचे किती शेती आहे. याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक लाभार्थी संयुक्त विहीर तयार करू शकतात. यासाठी ०.६० शेती असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने तीन लाख रूपयांचीे तरतूद केली आहे.
बोअर अभावी १३६ विहिरी अपूर्ण
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात येणाºया विहिरींचे काम प्रगती पथावर आहे. ४०४ पैकी १३६ विहीरींमध्ये बोअर होऊ शकले नाही. १५१ विहिरींचे काम ५० टक्के झाले आहे. ११७ विहीरींचे काम फक्त २५ टक्के झाले आहे. मागील दोन वर्षातच गोंदिया जिल्ह्यातील विहिरींचे कामे पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु अडीच वर्ष लोटूनही काम पूर्ण झाले नाही. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे विहिरींचे काम संथ गतीने सुरू असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.