दोन चिमुकल्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू
By अंकुश गुंडावार | Published: September 7, 2024 05:26 PM2024-09-07T17:26:11+5:302024-09-07T17:26:48+5:30
पोंगेझरा येथील घटना : कुटुंबीयांवर आघात
गोरेगाव (गोंदिया) : नाल्यावरील पुलावर खेळताना दोन चिमुकल्या भावंडांचा तोल गेल्याने नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पोंगेझरा हिरडामाली येथे घडली. रुद्र सुजित दुबे (३), शिवम सुजित दुबे (२) असे नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्या भावंडांची नाव आहे.
तालुक्यातील पोंगेझरा हिरडामाली येथे प्रसिद्ध शिवमंदिर आहे. या मंदिरात पुजारी म्हणून सुजित दुबे हे काम पाहतात. मंदिर परिसरातच ते कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांची दोन्ही मुले खेळता खेळता नाल्यावरील पुुलावर गेली. दरम्यान, खेळताना त्या दोन्ही चिमुकल्यांचा तोल गेल्याने ते दोघेही नाल्यात वाहून गेल्याचा अंदाज लावला जात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही चिमुकले घरी न परतल्याने त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचा मंदिर परिसरात शोध घेतला. पण त्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे वडील सुजित दुबे यांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता गोरेगाव पोलिस स्टेशन गाठून मुले हरविल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केल्यानंतरही त्यांची दोन्ही चिमुकले सापडली नाही. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पोंगेझरा हिरडामालीजवळील नाल्यात तंरगताना आढळले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती गोरेगाव पोलिस स्टेशन व चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना दिली. या दुर्दैवी घटनेमुळे दुबे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कमी उंचीच्या पुलाने केला घात
हिरडामाली येथील मंदिर परिसरात असलेल्या नाल्यावर तयार करण्यात आलेला पूल हा कमी उंचीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात नेहमी या पुलावरून पाणी वाहत असते. दरम्यान, खेळता खेळता या पुलावर गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तोल जाऊन नाल्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याने या परिसरातील नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.