उद्धवसेनेला जिल्ह्यात भोपळा, बंडखोरीची शक्यता बळावली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 04:04 PM2024-10-26T16:04:32+5:302024-10-26T16:06:15+5:30

कुथे यांच्या भूमिकेकडे लक्ष : गोंदिया विधानसभा मतदारसंघात अस्वस्थता

Uddhav Sena got zero seat in district, the possibility of rebellion has increased | उद्धवसेनेला जिल्ह्यात भोपळा, बंडखोरीची शक्यता बळावली

Uddhav Sena got zero seat in district, the possibility of rebellion has increased

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उद्धवसेनेचा जिल्ह्यातील चारपैकी एक गोंदियाच्या विधानसभा मतदारसंघासाठी होता, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तिरोडा मतदारसंघ देत उर्वरित तिन्ही जागा काँग्रेसने स्वतःकडे ठेवल्या. त्यामुळे उद्धवसेनेला जिल्ह्यात भोपळा मिळाला आहे. तर उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी बुधवारी (दि.२३) एक पक्षाकडून व एक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.


माजी आ. रमेश कुथे यांनी पुत्राच्या राजकीय भविष्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून उद्धवसेनेत घरवापसी केली. मातोश्रीवर शिवबंधन बांधल्यानंतर त्यांना गोंदिया विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. त्यामुळेच त्यांचे पुत्र या मतदारसंघात सक्रिय झाले होते. पण याचदरम्यान माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये घरवापसी केल्याने कुथेंचे समीकरण बिघडले. गुरुवारी काँग्रेसची पहिली यादी आली. पहिल्याच यादीत माजी आ. गोपालदास अग्रवाल याचे नाव आले. त्यामुळे या मतदारसंघावरील उद्धवसेनेचा दावा आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे माजी आ. रमेश कुथे व त्यांचे पुत्र सोनू कुथे हे निवडणुकीदरम्यान वेगळी भूमिका घेतात की पक्षाचा आदेश अंतिम मानून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 


२७ ला कार्यकर्त्यांची बैठक घेऊन घेणार निर्णय 
सोनु कुथे यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला नव्हता. त्यामुळे ते अपक्ष म्हणूनसुद्धा या मतदारसंघातून रिंगणात राहू शकतात. याच दृष्टीने त्यांनी आता चाचपणी सुरू केली असून २७ ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.


तिसऱ्यांदा होणार अग्रवाल विरुद्ध अग्रवाल सामना 
गोंदिया विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आ. विनोद अग्रवाल तर महाविकास आघाडीकडून माजी आ. गोपालदास अग्रवाल हे निवडणूक रिंगणात आहे. या दोघांमध्ये हा तिसऱ्यांदा सामना होणार आहे. सन २०१४ मध्ये गोपालदास अग्रवाल यांनी विनोद अग्रवाल यांचा पराभव केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत विनोद अग्रवाल यांनी गोपालदास अग्रवाल यांचा २७९०९ मतांनी पराभव केला होता. आता २०२४ च्या निवडणुकीत तिसऱ्यांदा दोघेही समोरासमोर आले आहेत.

Web Title: Uddhav Sena got zero seat in district, the possibility of rebellion has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.