दुर्गम क्षेत्रात शिक्षणाची गोडी निर्माण करणारे उके सर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:28+5:302021-09-05T04:33:28+5:30
विजय मानकर सालेकसा : महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर स्थित विचारपूर येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक विनोद उके एक तंत्रस्नेही ...
विजय मानकर
सालेकसा : महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर स्थित विचारपूर येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक विनोद उके एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ओळखले जातात. दुर्गम आदिवासी क्षेत्रातील गरीब आदिवासी व वंचित कुटुंबातील चिमुकल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यात गणित आणि इंग्रजी विषयाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याने ते एक उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात.
सालेकसा तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेल्या विचारपूर नावाचे गाव आहे. चारही बाजूने पर्वतरांगामधे दऱ्याखोऱ्यात हे गाव वसलेले आहे. या गावामध्ये सर्वसामान्य बाहेरच्या व्यक्तीस भीती वाटते. अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग असून, २४ तास भयाचे वातावरण व या परिसरात राहणारे गरीब आदिवासी लोक अजूनही मोठ्या प्रमाणावर निरक्षर व अशिक्षित आहेत. मोलमजुरी किंवा वनोपजावर जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे म्हणजे मोठे आव्हानच. मात्र या आव्हानाला सामोरे जात वंचित मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी नेहमी नवनवीन उपक्रम राबवित असल्यामुळे त्यांचे छोटे-छोटे विद्यार्थी निर्भयतेने आपल्या गुरुजींच्या सहवासात वावरत असतात. एकूण १८ वर्षांच्या नोकरीच्या काळातील तब्बल १२ वर्षे त्यांनी अतिसंवेदनशील व दुर्गम आदिवासी भागात काढले. आजही याच क्षेत्रात आपल्या ज्ञानाच्या प्रसार करीत आहेत. भरपूर संगणकीय ज्ञान असले तरी डिजिटल साधनाचा वापर आणि पारंपरिक अध्यापन पद्धतीतील काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंबन मुलांना आनंददायी वातावरण निर्माण करीत मनोरंजन करण्यासाठी गाणी, कथा इत्यादी ऐकवून मन प्रफुल्लित करून नवसंचार निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कृतीमुळे पालकवर्गसुद्धा त्यांच्याकडे त्यांच्या कार्याने समाधानी आहे.
............
बचतीसाठी डीकेएस बँक
विद्यार्थ्यांना पैशाच्या बचतीची सवय लागावी म्हणून शाळेत डीकेएस नावाने बँक स्थापन करून विद्यार्थ्यांना खाऊसाठी पालकांकडून मिळालेले पैसे या बँकेत ठेवण्यासाठी ते प्रवृत्त करतात. दिनेश उके हे एक तंत्रस्नेही शिक्षक व मार्गदर्शक असल्याने डायटने जिल्ह्यात त्यांना बोलावून जिल्ह्यातील शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्याकरिता नियुक्त करीत दोन वर्ष त्यांच्या संगणकीय ज्ञानाचा उपयोग करून घेतला. परंतु दिनेश उके यांनी पुन्हा आपले पाऊल आदिवासी गावाकडे वळविले. आजही ते विचारपूरसारख्या अतिदुर्गम भागातील गावात जिथे कसलीही प्रवासाची सोय नाही अशा गावातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत आहेत. शिक्षकदिनी त्यांच्या या कार्याला लोकमतचा सलाम.
..............
इंग्रजीचे ज्ञान वाढविण्यासाठी शब्दांची बँक
इंग्रजीचे ज्ञान वाढविण्यासाठी व विषयाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी इंग्रजी शब्द बँक उपक्रम शिक्षक उके राबवित आहेत. त्यामुळे विद्यार्थी इंग्रजीपासून दूर न पळता स्वयंस्फूर्त भाग घेत असतात. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून दररोज आरोग्याविषयी मार्गदर्शन करतात. गणिताची आवड निर्माण करण्यासाठी दैनंदिनी उपयोग असणाऱ्या वस्तू संकलित करून वजाबाकी सहज सोप्या पद्धतीने गणित शिकवितात.