‘उमरझरी’चे पाणी वडेगावला पोहोचलेच नाही
By admin | Published: January 20, 2015 10:37 PM2015-01-20T22:37:42+5:302015-01-20T22:37:42+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून उमरझरी प्रकल्पाची ओळख आहे. या प्रकल्पाची निर्मिती होवून २५ वर्षे पूर्ण झालीत. पण त्या प्रकल्पाचे पाणी वडेगावपर्यंत पोहोचलेच नाही.
राजेश मुनीश्वर - सडक-अर्जुनी
सडक-अर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून उमरझरी प्रकल्पाची ओळख आहे. या प्रकल्पाची निर्मिती होवून २५ वर्षे पूर्ण झालीत. पण त्या प्रकल्पाचे पाणी वडेगावपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे सिंचनाची सोय नसलेले वडेगाववासी आजही उमरझरी मध्यम प्रकल्पाच्या पाण्याची वाट पाहात आहेत.
उमरझरी मध्यम प्रकल्पाचे क्षेत्रफळ ७०० हेक्टर क्षेत्रात विस्तारीत आहे. या तलावाचे सिंचन एक हजार ४७० हेक्टर क्षेत्रात होईल, असे नियोजन असल्याची माहिती आहे. पण तलावात पाणीसाठा राहात नसल्यामुळे फक्त २०० हेक्टर क्षेत्रात सिंचन होत असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्याने दिली. उमरझरीचे पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे यासाठी कोदामेडी उत्तरिका ही खजरी ते कोदामेडीपर्यंत सात किलोमीटर तयार करण्यात आली आहे. उत्तरिका तयार करण्यासाठी गरीब शेतकऱ्यांची शेती गेली, पण उपयोग काहीच होत नसल्याचे दिसत आहे. ‘नाव सोनाबाई, आणि हाती कथलाचा वाडा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
उमरझरी मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा हा १२ कि.मी.चा उमरझरी ते खजरी या गावापर्यंत खोदण्यात आला आहे. मुख्य कालव्यामुळे खजरी, कोहळीटोला व चिरचाडी या तीन गावातील ५६ हेक्टर क्षेत्रात सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात रबी पिकाला सिंचनाची सोय करण्यात आली होती. यावर्षी उमरझरी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा कमी असल्यामुळे कोणत्याही गावाला रबी पिकासाठी पाणी देण्यात येणार नाही, अशी माहिती उमरझरी मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता मंदिले यांनी दिली आहे.
या प्रकल्पाचे खरे नियोजन झाले असते तर तालुक्यातील बहुतांश गावे सुजलाम-सुफलाम झाली असती, पण नियोजन नसल्यामुळे उमरझरीचे पाणी वडेगाव पर्यंत पोहचू शकले नाही. सिंचनाचे पाणी न पोहोचल्याने हजारो एकर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. वडेगाववासीयांना पाणी न मिळाल्यामुळे फक्त खरीप पिके घेऊनच समाधान मानावे लागत आहे. निसर्गाने खरीप हंगामास दगा दिल्यास तेही पीक काही वेळा एका पाण्याने जाण्याचे चित्र पहावयास मिळते. उमरझरी मध्यम प्रकल्पाचे मोठे नहर तयार करुन शेतकऱ्यांची शेती त्या नहरात गेली आहे. शेती गेली पण एका पैशाचाही फायदा कोदामेडी उपकालव्याच्या लगत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. फक्त मोठमोठे नहर बांधून ठेवले आहेत. त्या उपकालव्यांना एकदाही पाणी न सोडल्याने त्या कालव्यांची दुरवस्था झाली आहे. नहरात ठिकठिकाणी झाडे व गवत वाढले आहे.
वडेगावच्या दिशेने येणारा लघुकालवा हा डोंगरगाव/खजरी गावाजवळ येवून थांबला आहे. या लघुकालव्यामुळे वडेगाववासीयांची १५० हेक्टर क्षेत्रात रबी पिके झाली असती. पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे हा लघुकालवा वडेगावकडे सरकलाच नाही. २५ वर्षापूर्वी जेव्हा मध्यम प्रकल्पाचे काम सुरू होते, तेव्हा वडेगावला पाणी पोहचणार, अशी चर्चा होती. वडेगाववासीयांच्या शेतीला चांगले दिवस येतील असे स्वप्न रंगविले जात होते.