व्याघ्र प्रकल्पाच्या बकी गेटमधून प्रवेशाचा मुहूर्त सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 12:09 AM2017-03-02T00:09:59+5:302017-03-02T00:09:59+5:30
नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक-अर्जुनी जवळील बकी गेट बंद असल्यामुळे पर्यटकांना मोठा फेरा घेत वनपर्यटनासाठी जावे लागत आहे.
पर्यटकांना फेरा : गैरसोयीकडे दुर्लक्ष
सडक-अर्जुनी : नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक-अर्जुनी जवळील बकी गेट बंद असल्यामुळे पर्यटकांना मोठा फेरा घेत वनपर्यटनासाठी जावे लागत आहे. हे गेट कधी सुरू होणार? असा प्रश्न वनभ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांकडून विचारला जात आहे.
सडक-अर्जुनीपासून चार किमी अंतरावर असलेले बकी गेट व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्ते खराब असल्याचे कारण पुढे करून गेट बंद करण्यात आले. बकी गेट बंद असल्यामुळे सडक-अर्जुनी, देवरी, गोंदिया, गोरेगाव, रायपूरकडून येणाऱ्या पर्यटकांना नवेगावबांधमार्गे धाबेपवनीवरुन नवेगाव व्याघ्र प्रकल्पात जावे लागत आहे. यामुळे २५ ते ३० किमीचा फेरा होतो.
व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्त्यांची हिवाळ्यापूर्वीच डागडुजी करणे आवश्यक होते. पण कोणीही अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे ‘दिन मे ढाई कोस’ कामाची गती सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान २५ हजार ६६४.७० हेक्टर क्षेत्रात विस्तारित आहे. यात वनपरिक्षेत्र कार्यालये तीन आहेत. डोंगरगाव-डेपो, नवेगावबांध व बोंडे हे तीन असून डोंगरगाव-डेपोअंतर्गत मासुलकसा, डोंगरगाव-खडकी या तीन सहवनक्षेत्र कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. त्यात ५९११.३७ हेक्टर आर क्षेत्र आहे.
बोंडे वनपरिक्षेत्रात पिंडकेपार, झाशीनगर, बोंडे हे तीन सहवनक्षेत्र कार्यालये असून ६३६४.३० हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. याचे अधिकारी महेश चोपडे हे कारभार पाहत आहेत. नवेगावबांध वनपरिक्षेत्रात पौनी, निशानी, कोकणा-जमी., कोसबी या चार सहवनक्षेत्राची निर्मिती केली असून १३ हजार ३८८ हेक्टर आरक्षेत्र वनांनी व्यापले आहे. या क्षेत्राची नवेगावबांधचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील हे देखरेख करीत असल्याचे दिसत आहेत. डोंगरगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक बागडे आहेत. नवेगाव व्याघ्र प्रकल्पात तीन रेंज आॅफीस तर सात सहवनक्षेत्र कार्यालये आहेत. सर्वात मोठे वनक्षेत्र कार्यालय म्हणून नवेगावबांधची ओळख आहे.
सडक-अर्जुनीवरून नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचा खरा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी बकी गेटची निवड केली आहे. या गेटमधून जाताना झनकारगोंदी तलाव, काळीमाती, कवलेवाडा परिसरातील गवत कुरण आजही पाहण्यासारखे आहेत.
झनकारगोंदी तलाव परिसरात रानगवे, सांबर, हरण, वाघ, बिबट, अस्वल यासारखे प्राणी प्रामुख्याने पहावयास मिळतात. झलकारगोंदी परिसरात जाण्यासाठी बकी गेट फारच सोयीचे होते. पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे १ आॅक्टोबरपासून पर्यटकांना पर्यटनाच्या आनंदापासून मुकावे लागत आहे. येणाऱ्या पुढील तीन महिन्यांसाठी तरी बकी गेट सुरू होईल का? असा आशावादी प्रश्न पर्यटक विचारत आहेत. बकी गेट बंद ठेवल्यामुळे या गेटच्या भरवशावर उदरनिर्वाह करणारे गाईड यांच्यावरही कुऱ्हाड कोसळली आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी कोहमारा चौक, बकी फाटा या मार्गात व्याघ्र प्रकल्पाचे प्रसिध्दीफलक लावणे गरजेचे आहे. त्यात विविध पक्षी, प्राण्यांचे फोटो लावणे तेवढेच महत्वाचे आहे. बकी गेट कोहमारावरून तीन किमी अंतरावर आहे. या गेटच्याजवळ पर्यटकांना राहण्यासाठी टेंटची (तंबू) निर्मिती करणे गरजेचे आहे. ईडिसीच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होईल व परिसरातील व्यवसायीकांच्या व्यवसायात वाढ होईल, हे विशेष!
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी गेट तयार केले आहेत. त्या गेटवर राहणाऱ्या हंगामी मजुरांना पिण्याच्या पाण्याची समस्या नेहमीच भेडसावत आहे. त्या मजुरांना पिण्याचे पाणी कोसबी या दीड किमी गावावरून आणावे लागत आहे. गेटजवळ बोअरवेलची सुविधा आहे. पण पाणी पिण्यायोग्य नाही. या बोअरवेलचे पाणी वर्षानुवर्षे बाहेर काढल्या जात नसल्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती एका सूज्ञ नागरिकाने दिली आहे. रस्त्यांची कामे कासवगतीने सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)
नवेगाव व्याघ्र प्रकल्पामधील रस्त्यावर गिट्टी उखडली आहे. पर्यटकांच्या वाहनांना त्रास होतो. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर व वरिष्ठांची सूचना मिळाल्यावर बकी गेट सुरू करण्यात येईल.
- सुनील भोंडे, वनक्षेत्र सहाय्यक कोसबी, सडक-अर्जुनी