अनधिकृत ६७७ धार्मिक स्थळे होणार नियमित
By admin | Published: April 23, 2016 01:40 AM2016-04-23T01:40:00+5:302016-04-23T01:40:00+5:30
जिल्ह्यात सार्वजनिक किंवा शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून तयार करण्यात आलेल्या ६७७ अनधिकृत धार्मिक स्थळांना नियमित करण्यात येणार आहे.
कोणाकडूनही आक्षेप नाही : जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविले होते आक्षेप
नरेश रहिले गोंदिया
जिल्ह्यात सार्वजनिक किंवा शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून तयार करण्यात आलेल्या ६७७ अनधिकृत धार्मिक स्थळांना नियमित करण्यात येणार आहे. या धार्मिक स्थळांना नियमीत करण्यासाठी आक्षेप मागविले होते, परंतु दिलेल्या मुदतीत एकही आक्षेप आला नसल्यामुळे ही स्थळे नियमित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
प्रशासनाने जिल्हास्तरीय समिती गठीत करून अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाई समितीमार्फत राज्याच्या गृह विभागाच्या निर्णयानुसार २९ सप्टेंबर २००९ पुर्वीपासून तयार करण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांना तीन गटात विभागून यादी तयार करण्यात आली. या समितीनुसार अनधिकृत असलेल्या धार्मिक स्थळांची संख्या ६७७ आहे. समितीने एक पत्र काढून या धार्मिक स्थाळांबाबत पुराव्यासह आक्षेप सादर करा, असे म्हटले होते. आक्षेप नोंदविण्याची तारीख ५ एप्रिलपर्यंत देण्यात आली. परंतु या काळात कोणत्याही तालुक्यातून कुणीही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या अनधिकृत धार्मिक स्थळांना समितीची मान्यता मिळाल्यांंतर गृह विभागाच्या ५ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार नियमीत केले जाणार आहे.