देवा, आता तरी अंत पाहू नको! पावसाने वटारले डोळे; असह्य उकाडा, पिकांना धोका वाढला

By कपिल केकत | Published: August 31, 2023 07:19 PM2023-08-31T19:19:43+5:302023-08-31T19:20:09+5:30

आठवडाभरापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे एकीकडे पिकांना धोका वाढला आहे.

Unbearable heat, increased risk to crops, read here | देवा, आता तरी अंत पाहू नको! पावसाने वटारले डोळे; असह्य उकाडा, पिकांना धोका वाढला

देवा, आता तरी अंत पाहू नको! पावसाने वटारले डोळे; असह्य उकाडा, पिकांना धोका वाढला

googlenewsNext

गोंदिया: आठवडाभरापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे एकीकडे पिकांना धोका वाढला आहे. तेथेच उकाडा असह्य होत असून, त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. तापत्या उन्हामुळे शेतातील पाणी जिरले असून, वेळीच पाऊस न पडल्यास मात्र पिके हातून जाण्याची स्थिती आहे. यामुळे आरोग्यासाठी सर्वसामान्य, तर पिकांसाठी शेतकरी आकाशाकडे नजरा गाडून असून, प्रत्येकाच्या तोंडून ‘देवा, आता तरी अंत पाहू नको!’ एवढीच आर्त हाक निघत आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पूरपरिस्थिती होती. सर्वदूर पावसामुळे मागील वर्षी कित्येकांची पिके वाहून गेली होती. यंदा मात्र त्या विपरीत परिस्थिती असून, सर्वत्र पावसाची अत्यधिक गरज आहे. पावसाअभावी पिके सुकण्याच्या स्थितीत आली असून, वेळीच पाऊस न बरसल्यास मात्र शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. शिवाय, पाऊस नसल्यामुळे उकाडा वाढत चालला असून, गुरुवारी जिल्ह्याचे तापमान ३३ अंशावर होते. हा उकाडा असह्य होत असून, मधातच पावसाच्या सरी व त्यानंतर उन्हामुळे वातावरण कलुषित झाले असून, आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. यातूनच सध्या तापाची साथ सुरू आहे. ऑगस्ट महिना संपला असून, आता मात्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र पिकाचे नुकसान होणार, यात शंका नाही.

फक्त ०.५ मिमी पाऊस
मागील दहा-बारा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असून, या काळात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्याने त्यानंतर मात्र उकाडा वाढून तापाची साथ पसरत आहे. हा क्रम सुरूच असून, बुधवारपासून गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार फक्त ०.५ मिमी सरासरी पाऊस बरसला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यात ०.२ मिमी, तिरोडा तालुक्यात ०.३ मिमी, गोरेगाव ०.५ मिमी, सालेकसा ३.९ मिमी, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ०.२ मिमी पाऊस बरसला आहे.

 जमिनीला भेगा व पिके पिवळसर
मागील दहा- बारा दिवसांपूर्वी बरसलेल्या पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळाले, यात शंका नाही. मात्र, एकदा पावसाने दडी मारली व तीच परिस्थिती आता निर्माण होताना दिसत आहे. पाऊस बरसत नसून त्यात ऊन तापून तापमान ३३ अंशावर आले आहे. परिणामी, शेतातील पाणी जिरले असून, पिकांना पाण्याची गरज आहे. आता पाणी मिळाले नाही, तर उन्हामुळे पिके सुकणार, अशी स्थिती तयार होत आहे.

तूट गेली सरासरी ५४८ मिमीवर
मागील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १,३६४.३ मिमी पाऊस बरसला होता, तर यंदा ८१६.३ मिमी पाऊस बरसला आहे. यानंतर यंदा सरासरी ५४८ मिमी पावसाची तूट दिसून येत आहे. जसेजसे दिवस वाढत आहेत, तसतशी ही तूट वाढत चालली आहे. नियमित दमदार पावसानंतरच आता ही तूट भरून निघणार.

आतापर्यंत व बुधवारी बरसलेला पाऊस
तालुका - ३० ऑगस्ट - आतापर्यंत

  • गोंदिया - ०.२२ - ८४१.४
  • आमगाव - ०.० - ७२३.२
  • तिरोडा - ०.३ - ७०४.३
  • गोरेगाव - ०.५ - ७०२.३
  • सालेकसा - ३.९ - ८६३.५
  • देवरी - ०.० - ८९३.६
  • अर्जुनी-मोरगाव - ०.२ - ९१७.६
  • सडक-अर्जुनी - ०.० - ८२१.०
     

Web Title: Unbearable heat, increased risk to crops, read here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.