अनियंत्रित टवेरा विद्युत खांबावर धडकली: तीन ठार, १४ जखमी
By नरेश रहिले | Published: December 26, 2023 05:03 PM2023-12-26T17:03:20+5:302023-12-26T17:05:37+5:30
ही घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी १२:४० वाजता गोंदिया तालुक्याच्या दांडेगाव येथील बसस्थानकावर घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू तर १४ जण गंभीर जखमी झाले.
गोंदिया: भरधाव वेगात धावणाऱ्या टवेराचा ब्रेक लावताच वाहन अनियंत्रीत झाले. यात वाहनाच्या तीन पलटी खाल्या यात दोन महिलांचा जागीच मृत्यू तर एका चिमुकल्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी १२:४० वाजता गोंदिया तालुक्याच्या दांडेगाव येथील बसस्थानकावर घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू तर १४ जण गंभीर जखमी झाले.
तिरोडा तालुक्याच्या करटी येथील विनोद कितकीचंद इनवाते (३०) याचा साखरपुडा मजीतपूर येथील दिव्या संतोष उईके हिच्यासोबत असल्याने त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी टवेरा एमएच ४० ए ४२४३ या वाहनाने जात असतांना दांडेगाव येथील बसस्थानकावरून ही कार भरधाव वेगात धावत असतांना चालकाने अचानक ब्रेक लावल्याने त्या वाहनाने तीन कोल्हांड्या मारल्या. कार विद्युत खांबाला धडकून बिरनवार यांच्या अंगणात गेली. यात दोन महिला जागीच ठार झाल्या. छाया अशोक इनवाते (५८) रा. करटी गोनडीटोला, अनुरता हरिचंद ठाकरे (५०) रा. करटी यांचा जागीच मृत्यू झाला. तर देवांश विशाल मुळे (दिड वर्ष) रा. करटी या चिमुकल्याला उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच मृत्यू झाला. या अपघातात गंगाझरी पोलिसांनी वाहन चालक अतूल नानाजी पटले (२३) रा. परसवाडा अर्जुनी याच्यावर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात जखमी असलेल्यांमध्ये मनु कुमारू भोयर (६५) रा. करटी, सरस्वता ग्यानिराम उईके (७०) रा. परसवाडा/ अर्जुनी, लता विशाल मुळे (२५) , अहिल्या नामदेव कोडवते (५०), अर्पना रामरूप कावळे (शाहू) (२२), चंद्रप्रभा सुखदास कोडवते (५५) पियू रामरूप शाहू (साडे तीन वर्ष), निर्मला प्रभूदास कावळे (५०), लता शिवचरण बघेले , गीता प्रितचंद इनवाते (५०) पदमा राजकुमार इनवाते (५४) सर्व रा. करटी, बिरजुला जुळनलाल ठाकरे रा. आरंभा ता. बालाघाट, रियान अजय इनवाते (२) रा. भुराटोला व चालक अतूल नानाजी पटले (२३) रा. परसवाडा अर्जुनी हे जखमी झाले. जखमींवर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. या अपघातातील मनु कुमारू भोयर (६५) रा. करटी, सरस्वता ग्यानिराम उईके (७०) रा. परसवाडा/ अर्जुनी ह्या दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.
दिड वर्षाचा देवांश १५ मिटर फेकल्या गेला
कारचा वेग अधिक असल्याने अपघात होताच दिड वर्षाचा देवांश विशाल मुळे हा रस्त्यापासून १५ मिटर अंतरावरील रोहीणी प्रसाद बिरनवार यांच्या घरी फेकल्या गेला. तो गंभीर जखमी झाल्याने वेळीच उपचारासाठी गोंदियाला नेतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
साखरपुड्यासाठी जात होती ४ वाहने
साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी एक टवेरा व तीन स्कार्पीओ अशी चार वाहने जात असतांना भरधाव वेगात असलेल्या टवेराचा अपघात घडला. करटीहून १२:१५ वाजता निघालेल्या टवेराने जमुनिया, काचेवानी अंतर कापून दांडेगाव बसस्थानकावर येताच अपघात झाला.