पाण्याच्या टाकीखाली व्यापारी गाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:21 AM2018-04-08T00:21:03+5:302018-04-08T00:21:03+5:30
जिल्हा परिषदेतंर्गत तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून त्यांचे नियोजन नसल्याने या कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. याचाच परिचय बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील पाण्याच्या टाकीखाली व्यापारी गाळे ....
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : जिल्हा परिषदेतंर्गत तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून त्यांचे नियोजन नसल्याने या कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. याचाच परिचय बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील पाण्याच्या टाकीखाली व्यापारी गाळे बांधकामाचे ले-आऊट टाकल्याने दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.
नगर परिषद परिक्षेत्रात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव येथे रुग्णसेवा बंद करण्याचा घाट करुन येथील परिसरात जि.प.ने व्यापारी गाळे बांधकाम प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी मुलभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी जि.प. कडे निधी नाही. मात्र व्यापारी गाळे बांधण्यासाठी जि.प.कडे निधी असून रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी निधी नसल्याचे चित्र आहे. रुग्णालय परिसरात रुग्णांना सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज असताना जि.प.ने व्यापारी गाळे बांधकामाला प्राधान्य दिले आहे.
या परिसरातील जागेचे नियोजन नसताना या ठिकाणी व्यापारी गाळे बांधकाम नियोजन प्रस्तावाला ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर रुग्णालय परिसरात मंजूर प्रस्तावाप्रमाणे व्यापारी गाळ्यांसाठी जागाच नाही.त्यामुळे सरळ पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीच्या खालीच व्यापारी गाळे बांधकामाचे ले-आऊट देण्यात आले आहे. त्यामुळे बांधकामाच्या आराखड्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील नियोजन शुन्यता या बांधकामातून पुढे आल्याने रुग्ण सेवेचा प्रश्न पुढे ठाकला आहे. पाणी पुरवठा पाण्याच्या टाकीखालीच व्यापारी गाळे बांधकामाला मंजुरी मिळालीच कशी हा प्रश्न अनुत्तरित आहे.
तहसीलदार, प्रशासकांची बांधकामाला ताकीद
आमगाव येथील पाणी टाकीलगत सुरू असलेल्या व्यापारी गाळ्यांच्या बांधकामामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पाणीटाकी परिसरात काटेरी कुंपण तयार करुन सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली. मात्र कुंपनाच्या परिसरातच ले-आऊट टाकण्यात आल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार तहसीलदार साहेबराव राठोड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बांधकाम विभागाला ताकीद दिल्याची माहिती आहे.