नोकरी लावून देण्याच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:37 PM2019-05-17T21:37:48+5:302019-05-17T21:38:45+5:30
गोंदिया जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षकाची लावून देण्याच्या नावाखाली एका खासगी कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याने १५० बेरोजगार युवक-युवतींची ४४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार आज (दि.१७) तिरोडा येथे उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : गोंदिया जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षकाची लावून देण्याच्या नावाखाली एका खासगी कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याने १५० बेरोजगार युवक-युवतींची ४४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार आज (दि.१७) तिरोडा येथे उघडकीस आली आहे.
याप्रकरणी तक्रारकर्ते बेरोजगार युवक-युवतींनी शुक्रवारी पोलीस स्टेशन तिरोडा येथे पुरुषोत्तम सोनेकर, क्षेत्रीय अधिकारी स्ट्राँग सिक्युरिटी कंपनी यांच्या विरोधात तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, स्ट्रांग सिक्युरिटी गार्ड कंपनी बुटीबोरी नागपूरद्वारे गोंदिया जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक व सुपरवायझर पदावर नोकरीसाठी सोनेकर यांनी तक्रारकर्त्यांकडून प्रत्येकी ३५ हजार रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार तक्रारकर्ते बेरोजगारांनी कंपनीचे चंद्रभागा नाका तिरोडा येथील कार्यालयात जाऊन कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी सोनेकर यांच्याकडे प्रत्येकी ३५ हजार रुपये जमा करुन त्याची रीतसर पावती घेतली. त्यानंतर बेरोजगारही चार-सहा महिने कंपनी कार्यालयात नोकरीसाठी वारंवार विचारणा केल्यावर त्यांना नोकरीचे आदेश देत असल्याचे सांगून पैसे दिल्याची मूळ पावती २ फेब्रुवारी २०१९ ला परत मागविण्यात आली. त्यानंतर नोकरीचे आदेश बेरोजगारांना देण्यात आले. आदेश घेवून युवक-आरोग्य केंद्रात केले असता सदर आदेश निराधार असून त्यात आपली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. यावर बेरोजगारांनी पुन्हा कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सदर अधिकाºयांने आदेश नव्याने मंत्रालयातून येणार असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. बेरोजगारांनी याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्ट्रांग सिक्युरिटी कंपनीचे मुख्य कार्यालय बुटीबोरी नागपूर येथे जावून कंपनीचे संचालक डी.टी.लोहावे यांच्याकडे चौकशी केली असता कंपनी याप्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर बेजरोजगार युवकांनी तिरोडा येथील कंपनीच्या अधिकाºयाकडे दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावर सोनेकर यांनी कंपनीचे संचालक लोहावे यांनाच पैसे दिले असून त्यांचेकडे बोट दाखविले. पुन्हा बेरोजगारांनी कंपनी संचालक लोहावे यांना विचारले असता लोहावे यांनी पावतीची मागणी केली. सर्व प्रकारानंतर बेरोजगार युवकांना आपली पूर्णत: फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आनंदकुमार चौरे देवरी, जि.गोंदिया, विजयसिंह नैकाने महालगाव, दुर्गाप्रसाद डोहरे लांजी (बालाघाट), अनुप मेश्राम एकोडी, दिलीप उके फुटाना ता.देवरी, प्रितकुमार बन्सोड ढाकणी (गोंदिया), वर्षा राजेश हरिणखेडे (तिरोडा), दिक्षीता विकास हुमने गोंदिया, राजेंद्र रिनाईत सेजगाव (गोंदिया) व इतरांनी शुक्रवारी दुपारी पोलीस स्टेशन तिरोडा येथे तक्रार दाखल केली आहे.
चौकशीनंतर गुन्हा नोंदविणार-गौते
आरोग्य केंद्रात सुरक्षारक्षकाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली १५० बेरोजगारांना गंडविल्याची तक्रार आज (दि.१७) ला पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. याप्रकरणी चौकशी करुन चौकशीअंती गुन्हा नोंदविला जाईल.
- कैलास गौते,पोलीस निरीक्षक तिरोडा