सुतार व्यवसायावर बेरोजगारीची कुऱ्हाड
By admin | Published: May 27, 2017 12:52 AM2017-05-27T00:52:41+5:302017-05-27T00:52:41+5:30
पूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यांसाठी शेतकरी सुतारांकडे धाव घेत होते. मात्र, आता लाकडी अवजारा ऐवजी रेडीमेड मिळणारी लोखंडी अवजारे
बलुतेदारी पद्धत कालबाह्य : शेतकऱ्यांची "रेडिमेड" साहित्यांकडे धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यांसाठी शेतकरी सुतारांकडे धाव घेत होते. मात्र, आता लाकडी अवजारा ऐवजी रेडीमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध झाल्याने सुतारांच्या व्यवसायावर बेरोजगारीची कुऱ्हाड चालली आहे.
प्राचीन व मध्ययुगीन काळात ग्रामीण भागातील बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. ही पद्धती काळाच्या ओघात लुप्त पावत चालली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेडेगावात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार होते. बलुतेदार व अलुतेदार गावातील शेतकऱ्यांना वर्षभर सेवा पुरवत असून त्या मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून मोबदला म्हणून धान्य मिळे. परंतु, यांत्रिक युगाचा प्रारंभ झाल्यापासून शेतीमध्ये लागणाऱ्या लाकडी अवजाराऐवजी कारखान्यातूनच रेडिमेड मिळणारी लोखंडी अवजारे उपलब्ध होत असल्याने बारा बलुतेदारांमध्ये समाविष्ट असलेल्या सुतारांच्या व्यवसायावर पाणी फेरले आहे. सुतार कुटुंबीयांचे संपूर्ण जीवन हे त्यांच्या कलाकौशल्यातून घडविलेल्या विविध लाकडी वस्तूंच्या मिळकतीतून घडविले जात असे. शेतीसाठी लागणारे, नांगर, वखर, फन, डवरा, ज्यू, भोवऱ्या खाचरा बंडी, तिफन, खातवा, रुमण्या आदी इत्यादी अवजारे तर घरगुती साहित्यात पलंग, टेबल, खूर्ची, पाट, घराचे छप्पर ठोकणे, दरवाजे, खिडक्या, कोरपाट-बेलना आदी वस्तू तयार करीत असे. घरगुती साहित्य असो की, शेतीची अवजारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन साहित्य बनविण्यासाठी किंवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकरीवर्ग सुताराकडे येरझारा मारत असत. सुतारही त्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पाहिजे त्या आकारात शेतीची अवजारे बनवून देत असत. सुतार बनवलेल्या अवजारांपासून मिळालेल्या मिळकतीतून आपल्या कुटुंबीयांची गरज भागवीत असे. परंतु आता लोखंड व प्लास्टिकपासून बनविलेली शेतीची अवजारे बाजारात उपलब्ध झाली आहेत. किंमतीच्या बाबतीत ही अवजारे थोडी महाग असली तरी टिकावू होत असल्याने रेडिमेड अवजारांकडे आकर्षित होत आहे. यामध्ये बैलगाडी, भोवरी, वखर, डवरा शहरात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एकेकाळी १२ बलुतेदारांत महत्वाचा मानला गेलेला सुतार व्यवसाय करणाऱ्या सुतारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.