सोमवारपासून सर्वच व्यवहार अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 05:00 AM2021-06-06T05:00:00+5:302021-06-06T05:00:02+5:30
शासनाने सोमवारपासून पाचस्तरीय अनलॉक करण्याची घोषणा केली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.७) जिल्ह्यातील संपूर्ण व्यवहार सुरळीतपणे चालू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध सोमवारपासून आता पूर्णपणे शिथिल होणार आहेत. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. पूर्णपणे अनलॉक करण्यात येत असले तरी जिल्हावासीयांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे तर १८ जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने सोमवारपासून पाचस्तरीय अनलॉक करण्याची घोषणा केली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.७) जिल्ह्यातील संपूर्ण व्यवहार सुरळीतपणे चालू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध सोमवारपासून आता पूर्णपणे शिथिल होणार आहेत. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. पूर्णपणे अनलॉक करण्यात येत असले तरी जिल्हावासीयांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. शासनाने यासंदर्भात काढलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे की अनलॉक करण्यासाठी जे पाच टप्पे ठरविण्यात आले आहेत, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्हा पहिला टप्प्यात बसत असल्याने निर्बंध शिथिल करीत सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी (दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुध्दा पार पडली. त्यात जिल्ह्यात कुठले निर्बंध शिथिल करायचे यावर चर्चा करण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने सर्वच छोटे मोठे व्यवसाय आणि उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अर्थचक्रसुध्दा बिघडले आहे. त्यामुळे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी उद्योग आणि व्यवसायांची गाडी रुळावर आणण्यासाठी सोमवारपासून जिल्ह्यात पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे.
नियमांचे करावे लागणार काटेकोरपणे पालन
- कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात येत आहे. निर्बंध पूर्णपणे शिथिल झाल्याने नागरिकांनी बिनधास्तपणे न वागता पूर्वी इतकीच काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन व्यावसायिक आणि नागरिकांना पण करावे लागणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आदी गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
काय राहील सुरू
- अत्यावश्यक सेवेसह सर्वच प्रकारची व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू, किरकोळ वस्तू विक्रीची दुकाने, सुपर बाजार, हाॅटेल्स, रेस्टारंट व इतर दुकाने
- सलून, जीम, उद्याने, चित्रपटगृह, बाजारपेठा,
- सर्वच प्रकारची वाहतूक शंभर टक्के सुरू, एसटी बसेस पूर्ण क्षमतेेने सुरू
- प्रार्थना स्थळे, मंदिर, चर्च,
- सर्वच प्रकारच्या फेरीवाल्यांना वस्तूंची विक्री करण्याची परवानगी.
जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट २.५ टक्के असून ऑक्सिजन बेड सुध्दा केवळ ४.८ टक्के भरले आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश होत असल्याने सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरळीत व्हावे, आर्थिक गाडी रुळावर यावी, यादृष्टीनेच निर्णय घेण्यात येणार आहे.
- राजेश खवले, जिल्हाधिकारी