ग्रामरोजगार सेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन
By admin | Published: March 10, 2017 12:41 AM2017-03-10T00:41:47+5:302017-03-10T00:42:22+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्राम रोजगार सेवक शनिवार, ४ मार्च २०१७ पासून आपल्या प्रलंबित मागण्यांना
बीडीओंना निवेदन : मग्रारोहयोच्या कामावर विपरित परिणाम
देवरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्राम रोजगार सेवक शनिवार, ४ मार्च २०१७ पासून आपल्या प्रलंबित मागण्यांना घेवून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेले व सुरू होणाऱ्या कामावर विपरित परिणाम होत आहे.
या आंदोलनासंदर्भात ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी एस.एम. पांडे यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, २ फेब्रुवारी २००६ रोजी देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंमलात आणला आहे. यात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली असून याद्वारे ही योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेतून एका ग्राम रोजगाार सेवकाची निवड करण्यात येते. अशा ग्रामरोजगार सेवकांच्या समस्येबाबद आपली मागणी शासनापुढे वारंवार ठेवूनही शासन यांच्या मागण्यांकडे मुद्दाम कानाडोळा करीत आहे.
मागण्यांमध्ये रोजगार सेवकांना मासिक वेतन १२ हजार रुपये देण्यात यावे, त्यांना त्यांच्या गावापासून ५ किमीच्या आत स्थानांतरण करण्यात यावे आणि त्यांचे वेतन ग्रामपंचायतला जमा न करता ग्रामरोजगार सेवकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, अशा विविध मागण्यांना धरुन ग्राम रोजगार सेवक ४ मार्चपासून पूर्ण राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे म.ग्रा.
रो.ह.यो. अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील सुरू असलेले व सुरू होणाऱ्या कामावर विपरित परिणाम होत आहे.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष सहदेव गावळकर, उपाध्यक्ष मेघनाथ बहेकार, सचिव धनराज बहेकार, सहसचिव कमल सोनवाने, कोषाध्यक्ष जगदीश राऊत, सहकोषाध्यक्ष राजेंद्रसिंह पवार, सल्लागार व सदस्य भिमराज बोरकर, नरेश गुरनुले, सुभाष सोनवाने, राधेलाल शहारे, चिमनबापू वारई, अशोक कोचे, निर्मला कोसरे व संतोष करमकार यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)