बळिराजावर अवकाळी पावसाचे ढग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:41+5:302021-05-16T04:28:41+5:30
बिरसी फाटा : मागील आठवडाभरापासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. दिवसभर ऊन तापत असून, सायंकाळी आकाशात ढग दाटून ...
बिरसी फाटा : मागील आठवडाभरापासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. दिवसभर ऊन तापत असून, सायंकाळी आकाशात ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकावर संकट निर्माण झाले असून, कापणी केलेले धान खराब होण्याची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने पुन्हा काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बळिराजावर अवकाळी पावसाचे ढग कायम आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना मागील तीन-चार वर्षांपासून बसत आहे. जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. हा धान निघण्याच्या स्थितीत आहे. काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी व मळणी सुरू केली आहे; पण अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात हीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण आणि सिंचनाची सोय झाल्याने पीकसुद्धा चांगले होते. त्यामुळे खरिपापेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मागील आठ-दहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान कापणीला सुरुवात केली. जवळपास ५० टक्के धान कापणी पूर्ण झाली आहे. मात्र, याच दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने कापणी केलेले धानपीक संकटात आले आहे. काही भागात गारपीटसुद्धा झाली. त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर धान खराब झाले आहे. धान पाखड होण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरून निघणे कठीण झाले आहे.
.......
दोन-तीन हजार हेक्टरमधील धानाला फटका
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील दोन ते तीन हजार हेक्टरमधील धानाला फटका बसला. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे अजूनही करण्यात आले नाही. आधीच कोरोनामुळे हतबल झालेला शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या तडाख्यात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून मदतीची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
..........
हवामान विभागाचा पुन्हा इशारा
हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांनी धानाची कापणी करू नये. कापणी केलेला धान सुरक्षित ठिकाणी प्लास्टिक झाकून ठेवावा. पावसामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.