अवकाळी पावसाचा ६ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:29 AM2021-05-10T04:29:19+5:302021-05-10T04:29:19+5:30
गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्यामुळे रब्बी हंगामातील धानपीक संकटात आले आहे. शनिवारी (दि. ...
गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्यामुळे रब्बी हंगामातील धानपीक संकटात आले आहे. शनिवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे ६ हजार हेक्टरमधील कापणी केलेल्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अवकाळीचे संकट कायम आहे.
मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्येसुध्दा पुरेसा पाणीसाठा होता. तर रब्बी पिकांना अनुकूल असे वातावरण होते. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात ६६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. मागील तीन-चार वर्षांतील हा सर्वाधिक आकडा होय. सुदैवाने यंदा रब्बी धानाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने धानाची वाढ सुध्दा चांगली झाली होती. खरीप हंगामापेक्षा रब्बीतील धानाची स्थिती चांगली होती. त्यामुळे यंदा रब्बीचे बंपर उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणीसुध्दा सुरू केली असून जवळपास ६ हजार हेक्टरमधील धान कापणी करून बांध्यामध्ये पडला आहे. या धानाला शनिवारी दुपारच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची चिंता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. अवकाळी पावसाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नसून हवामान विभागाने पुन्हा पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस गारपिटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट कायम आहे.
........
तूतार्स धान कापणी नको
सध्या रब्बी हंगामातील धान कापणी जोरात सुरू आहे. मात्र अवकाळी पावसाचे संकट कायम असल्याने तूर्तास काही दिवस धान कापणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे धानाची कापणी करून तसेच कापणी केलेला धान सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.
...............
नुकसानीचे पंचनामे केले सुरू
मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस जिल्ह्यात हजेरी लावत आहे. शनिवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
.......