जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, रब्बी धानपिकांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 03:51 PM2021-05-19T15:51:06+5:302021-05-19T15:52:51+5:30

बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा कापणी केलेल्या ६ ते ७ हजार हेक्टरमधील धानाला बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

Untimely rains with strong winds in the gondia, damage to rabi crops | जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, रब्बी धानपिकांचं नुकसान

संग्रहित छायाचित्र

Next


गोंदिया : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्यात अवकाळी पाऊस अधूमधून हजेरी लावत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांची तारांबळ उडाली होती. 

तोक्ते वादळाच्या पार्श्वभुमीवर हवामान विभागाने काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो खरा ठरत आहे. बुधवारी (दि.१९) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे लोट निघाले होते. वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली. तसेच काही व्यावसायीक प्रतिष्ठाणांच्या टिनच्या छताचीही पडझड झाली होती. जिल्ह्यात रब्बी धानाची कापणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. त्यातच अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

बुधवारी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा कापणी केलेल्या ६ ते ७ हजार हेक्टरमधील धानाला बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांवरील अवकाळीचे संकट कायम आहे. 

उघड्यावरील धानाला फटका -
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने मागील खरीप हंगामात ३३ लाख क्विंटल धान खरेदी केले. त्यांपैकी जवळपास दीड लाख क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. या धानाला मागील सात आठ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

तुर्तास धान कापणी नकोच -
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण ६६ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. यापैकी ७ ते ८ हजार हेक्टरमधील धानाची कापणी पूर्ण झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध्यामध्ये धान पडून आहे. या धानाला बुधवारी आलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले. तर हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कृषी विभागाने तुर्तास धानाची कापणी न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
 

Web Title: Untimely rains with strong winds in the gondia, damage to rabi crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.