महाराष्ट्रातील युरिया व्हाया सालेकसा छत्तीसगडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 05:00 AM2021-08-26T05:00:00+5:302021-08-26T05:00:02+5:30
खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते, त्यामुळे कृषी विभागाकडूनसुद्धा त्याच दृष्टीने नियोजन केले जाते. यंदा कृषी विभागाकडून जेवढे नियतन मंजूर करण्यात आले, तसेच महिन्यानुसार खताची मागणी नोंदविली होती, त्यापेक्षासुद्धा अधिक प्रमाणात युरियाचा पुरवठा जिल्ह्याला करण्यात आला, तर १९०० मेट्रिक टनचा बफर स्टॉकसुद्धा रिलीज करण्यात आला.
अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात युरियाचा कृत्रिम टंचाई निर्माण करून काही विक्रेते त्याची अधिक दराने विक्री करीत आहेत. तर सालेकसा, आमगाव, देवरी या तालुक्यातून युरिया मोठ्या प्रमाणात छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात पाठविला जात आहे. तेथील विक्रेते थेट जागेवरून २६७ रुपयांच्या युरियाची ३५० रुपयात उचल करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते, त्यामुळे कृषी विभागाकडूनसुद्धा त्याच दृष्टीने नियोजन केले जाते. यंदा कृषी विभागाकडून जेवढे नियतन मंजूर करण्यात आले, तसेच महिन्यानुसार खताची मागणी नोंदविली होती, त्यापेक्षासुद्धा अधिक प्रमाणात युरियाचा पुरवठा जिल्ह्याला करण्यात आला, तर १९०० मेट्रिक टनचा बफर स्टॉकसुद्धा रिलीज करण्यात आला. आतापर्यंत जवळपास १३ हजार मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला आहे; मात्र यानंतरही शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याची ओरड आहे. तर काही विक्रेते युरियासह संयुक्त खते घेण्याची सक्ती करीत आहेत. यामुळे दोन्ही बाजुने शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. विशेष म्हणजे काही कंपन्या विदर्भ मार्केटिंग फेडरेशनला कमी प्रमाणात खत देत असून, काही वितरकांवर मेहरबानी दाखवित आहे. या सर्व प्रकाराची खोलात जावून माहिती घेतली असता देवरी, आमगाव, सालेकसा या तालुक्यातून युरिया छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात पाठविला जात आहे. तेथील विक्रेते थेट जागेवरून ३५० प्रति बॅग प्रमाणे उचल करीत आहे. तर विक्रेत्यांनासुद्धा शंभर रुपये अतिरिक्त मिळत असल्याने ते सुद्धा खुश असल्याची माहिती आहे; मात्र यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युरियाच्या टंचाईस तोंड द्यावे लागत आहे.
इ-पास मशीनवर नोंद नाही
- कृषी केंद्र संचालकांना खताची विक्री करण्यासाठी इ-पास मशीनवर नोंद आणि शेतकऱ्यांचे अंगठे घेणे अनिवार्य आहे. स्टॉक बुक आणि इ-पास वरील रेकार्ड जुळणे आवश्यक आहे; मात्र काही विक्रेते इ-पासवर नोंदणीच करीत नसल्याचे प्रकार सुरू असून, १३ कृषी केंद्रांना कृषी विभागाने नोटीससुद्धा बजावली आहे.
सीमा तपासणी नाक्यावर वॉच
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सालेकसा या तालुक्यातून युरिया खत मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जात असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील सीमा तपासणी नाक्यावर वाॅच ठेवण्याबाबतचे पत्र पोलीस विभागाला दिल्याची माहिती आहे.
सखोल चौकशी केल्यास मोठे मासे लागतील गळाला
- महाराष्ट्रातून मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या युरियाची सखोल चौकशी केल्यास यातील बराच अनागोंदी कारभार पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय यातील मोठे मासेसुद्धा गळाला लागू शकतात.