आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:03+5:302021-06-26T04:21:03+5:30
बोंडगावदेवी : शेतजमिनीतून भरघोष उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे, शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या ...
बोंडगावदेवी : शेतजमिनीतून भरघोष उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे, शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकरी हितावह उपक्रम राबविले जात आहे. पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नावीण्यपूर्ण पीक उत्पादन घ्यावे, कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शेतीची मशागत केल्यास भरघोष उत्पादन होऊन शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावेल असा आशावाद तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांनी व्यक्त केला.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत सिलेझरी येथे कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सिलेझरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी संजीवनी मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी सरपंच सुनीता ब्राम्हणकर, उपसरपंच सुखदेव मेंढे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे उपस्थित होते. रवींद्र लांजेवार म्हणाले, सध्या खरिपाचा हंगाम सुरु आहे. खरिपामध्ये भरघोष उत्पादन शेतकऱ्यांच्या दारात यावे यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी शासनाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम २१ जूनपासून १ जुलैपर्यंत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यात पिकाची लागवडीसाठी सुधारित तज्ज्ञांचा वापर करणे, श्री पद्धत, पट्टा पद्धत, चार सुत्री, ड्रम सीडरचा वापर करुन भात लागवड करण्यासंबंधी त्यांनी विस्तृत माहिती दिली. तालुक्यातील १४ गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेंतर्गत दर दिवशी गावात भेट देऊन बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, भात क्षेत्रात सुधारित भात लागवड, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, तालुक्यातील क्षेत्र विकास उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, महत्त्वाचा पिकाची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना याविषयी माहिती शेतकऱ्यांना पोहच विचार असल्याचे सांगण्यात आले.