रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा ऑक्सिजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:27 AM2021-05-01T04:27:43+5:302021-05-01T04:27:43+5:30
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी येथे एका आरोग्यसेविकेचा नुकताच मृत्यू झाला. एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक ...
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी येथे एका आरोग्यसेविकेचा नुकताच मृत्यू झाला. एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक सहायक पद अशी ३ पदे, बोंडगावदेवी आयुर्वेदिक दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद, एमपीडब्ल्यू कर्मचाऱ्यांची तीन पदे, भिवखिडकी, चान्ना, पिंपळगाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांमध्ये रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ऑक्सिजनवर आल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात डॉक्टर्स सेवा देण्यास इच्छुक नसतात, परिणामी आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १६ पदे मंजूर आहे. यापैकी ८ अधिकारी-कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे, उर्वरित आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केंद्राचा अतिरिक्त भार आलेला आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत २३ गावांचा समावेश होतो. गावोगावी जाऊन लसीकरण व तपासणी हे या केंद्राचे सध्या दैनंदिन कार्य आहे. आतापर्यंत केंद्रासोबतच उपकेंद्र बोन्डगावदेवी, भिवखिडकी,निमगाव, पिंपळगाव, डोंगरगाव, सिलेझरीसह सिरेगाव, गुढरी, घुसोबाटोला, बोद्रा, विहीरगाव, अरततोंडी, दाभना या गावोगावी जाऊन लसीकरण व गरज पडल्यास कोरोना चाचणी करीत आहे. अशाही परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना लसीकरण व चाचणीचे कार्य जिवाची पर्वा न करता करीत आहेत. रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना मदत होईल.
.....
जनता दरबारात उपस्थित केला होता प्रश्न
तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या जनता दरबारात हा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा त्यांनी ही रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले होते. पण याला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. परंतु, पदे भरण्यात आली नाहीत. केंद्रातील दोन सामुदायिक अधिकारी, एक आरोग्यसेविका, एक सहायक, एक सफाई कामगार, एक एमपीडब्ल्यू कर्मचारी असे एकूण ८ जण कोरोनाबाधित झाले आहेत. आता या केंद्राचा डोलारा दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषधी निर्माता, एक बाह्यरुग्ण आरोग्य सेविका, एक साहाय्यक यांच्यावर सुरू आहे.
....
लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह
दिवसेंदिवस आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित होत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण व तपासणी कार्यात अनेक अडथळे येत आहेत आहेत. उपलब्ध मनुष्यबळावर निर्धारित कार्य पूर्ण होत नाहीत. त्यामुळे संसर्गाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्यवर्धिनी केंद्र व उपकेंद्रातील रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.