पहिल्याच दिवशी १०४३ युवांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:20 AM2021-06-21T04:20:28+5:302021-06-21T04:20:28+5:30
गोंदिया : राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवारपासून (दि.१९) सर्वत्र ३०-४४ वयोगटातील युवावर्गाच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या गटातील युवांचा ...
गोंदिया : राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवारपासून (दि.१९) सर्वत्र ३०-४४ वयोगटातील युवावर्गाच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या गटातील युवांचा उत्साह पहिल्याच दिवशी बघता आला असून शहरातील १०४३ युवांनी लसीकरण करवून घेतले. यामुळे आता लसीकरणाला आणखी वेग येणार असल्याचे दिसते.
सोमवारपासून (दि.२१) देशात १८-४४ वयोगटांचे लसीकरण करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार, आरोग्य यंत्रणा कामाला लागली होती व या गटातील युवांमध्ये चांगलाच उत्साह दिसत होता. मात्र, अचानकच होणारी गर्दी व अशात लसींचा तुटवडा निर्माण होऊ नये, या दृष्टीने राज्य शासनाने तडकाफडकी यात बदल करीत राज्यात १८ ऐवजी ३० वर्षांपुढील युवांच्या लसीकरणाला परवानगी दिली. त्यानुसार, अवघ्या राज्यातच आता ३०-४४ वयोगटांचे लसीकरण केले जात आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनानेही लसीकरण कार्यक्रम सुरू केला व शनिवारी (दि.१९) शहरात ५ केंद्रांवर ३०-४४ वयोगटांचे लसीकरण करण्यात आले. यात, अगोदरच उत्साहात असलेल्या युवांनी चांगला प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी १०४३ युवांनी लसीकरण करवून घेतले आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागानुसार, १८-४४ वयोगटांतील सुमारे ६.२५ तरुण-युवा आहे. आता ३० वर्षांपासून लसीकरणाला सुरुवात झाल्याने लसीकरणाला आणखी गती येणार, असे दिसते.
------------------------------
राज्य शासनाच्या आदेशाची वाट
केंद्र शासनाने २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणास परवानगी दिली होती. मात्र, अचानक एवढी व्यवस्था करताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होणार असल्याचे बघता राज्य शासनाने १८ ऐवजी ३० वर्षांपासून लसीकरणाला परवानगी दिली. ऐनवेळी हा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार राज्यात अंमलबजावणी केली जात आहे. तर, १८ वर्षांपासून कधी याबाबत तरुणांत उत्कंठा वाढत आहे. मात्र, राज्य शासनाचे अद्याप याबाबत काहीच आदेश आले नसून आरोग्य विभागालाही त्यांच्या आदेशाची वाट आहे.