एकाच दिवशी शहरातील ४६५१ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:27 AM2021-05-17T04:27:05+5:302021-05-17T04:27:05+5:30
गोंदिया : कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हाच पर्याय असल्याने शासनाकडून आता लसीकरणावर जोर दिला जात आहे. अशात नागरिकांना ...
गोंदिया : कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हाच पर्याय असल्याने शासनाकडून आता लसीकरणावर जोर दिला जात आहे. अशात नागरिकांना लसीकरणात सुविधा व्हावी म्हणून शहरात १० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात शनिवारी (दि.१५) या केंद्रांवर ४६५१ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. मात्र आता कोरोनाशी लढण्यासाठी लसीचे कवच हाती आले असून, जास्तीत जास्त लसीकरण करवून कोरोनाला हरविता येणार आहे. यामुळेच आता शासनाकडून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. अशात मध्यंतरी १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता त्यावर बंदी घालण्यात आली असून, ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिली लस देण्यावर जोर दिला जात आहे. मात्र, सध्याच्या ठराविक केंद्रांवर गर्दी होत असल्याने त्याला आवर घालणे गरजेचे असून, नागरिकांना सोयीचे व्हावे हे ही गरजेचे आहे. यातूनच नगर परिषदेने शहरातील १० शाळांमध्ये १५ व १६ तारखेला विशेष लसीकरण मोहीम हाती घेत लसीकरण केंद्र सुरू केले आहे. यात मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.१५) या १० केंद्रांवर ४६५१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ४५ वर्षांवरील नागरिकांनी या केंद्रांवर लसीचा पहिला डोस घेतला आहे. एकंदर लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.