जिल्ह्यात ८४.४६ टक्के गोवर रूबेला लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:02 AM2019-01-05T00:02:36+5:302019-01-05T00:04:27+5:30
सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या गोवर रूबेला लसीकरण अभियानात आतापर्यंत ८४.४६ टक्के लसीकरण करण्यात आले. उर्वरीत ८ हजार २१९ बालकांचा शोध घेऊन १५ जानेवारीपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या गोवर रूबेला लसीकरण अभियानात आतापर्यंत ८४.४६ टक्के लसीकरण करण्यात आले. उर्वरीत ८ हजार २१९ बालकांचा शोध घेऊन १५ जानेवारीपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.
गोवर-रूबेला आजार सन २०२० पर्यंत निर्मुलन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात ही मोहीम २७ डिसेंबरपर्यंत राबविण्यात आली. या मोहीमेंतर्गत ९ महिन्यापासून १५ वर्षापर्यंतच्या ३ लाख ३५ हजार ९५७ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. यात आत्तापर्यंत २ लाख ८३ हजार ७६१ बालकांना लसीकरण करण्यात आले. आता केवळ १५.५४ टक्के बालकांना लसीकरण करायचे आहे. जिल्हा प्रशासनाने या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्याने ७७.५४ टक्के उद्दिष्टे पूर्ण केले आहे. जिल्ह्यात सालेकसा तालुक्यात ९५.६२ टक्के करून प्रथम क्रमांकावर, यानंतर सडक-अर्जुनी ९४.९४, देवरी ९१.९९, आमगाव ८९.२३, अर्जुनी-मोरगाव ८६.०३, गोंदिया ग्रामीण ७४.२४ तर तिरोडा ग्रामीणमध्ये ९१.४५, गोंदिया शहरात ८६.५५ व तिरोडा शहरात ९०.०८ टक्के लसीकरण करण्यात आले. लसीकरणातून सुटलेल्या बालकांना जिल्हास्तरावरील आकडीवर नजर टाकली असता २ हजार १९६ बालकांचा समावेश आहे. राज्य स्तरावर देण्यात आलेल्या उद्दिष्टातील ८ हजार २१९ बालकांचे लसीकरण झाले नाही. लसीकरणाचे उद्दीष्टे वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
विदर्भात भंडारा पहिला
विदर्भाच्या ६ जिल्ह्यात झालेल्या लसीकरणात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर वर्धा द्वितीय, चंद्रपूर-नागपूर तृतीय, गडचिरोली, चतुर्थ व गोंदिया पाचव्या क्रमांकावर आहे.