१४० गावांत एकाच दिवशी ८,५४६ नागरिकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:26 AM2021-04-05T04:26:02+5:302021-04-05T04:26:02+5:30
गोंदिया : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करताना अधिकाधिक व्यक्तींच्या लसीकरणासाठी प्रयत्न होऊ लागलेत. गोंदिया ...
गोंदिया : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करताना अधिकाधिक व्यक्तींच्या लसीकरणासाठी प्रयत्न होऊ लागलेत. गोंदिया जिल्ह्यात कोविड १९चा प्रभाव वाढू नये, यासाठी विकेंद्रीकरण करीत थेट १४० गावांत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ३ एप्रिल रोजी ८,५४६ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.
गावस्तरावर लसीकरणाचा अभिनव उपक्रम राबविणारा गोंदिया जिल्हा राज्यातील प्रथम व एकमेव जिल्हा ठरला आहे. ४५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील व्यक्तींना प्रथम लस देण्याचे शासनाचे धोरण आहे. कोविड १९च्या वाढत्या प्रभावावर प्रतिबंधात्मक उपायासोबतच लसीकरणही गरजेचे आहे. गोंदिया जिल्ह्यात कोविड १९चा प्रभाव वाढू नये, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि पंचायत विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील १४० गावांत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोविड १९चा प्रभाव संपूर्ण राज्यात वाढत आहे. चक्राकार गतीने वाढणाऱ्या या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत गरजेचे आहेत. लसीकरणासह संबंधित सर्वच व्यक्तींनी चेहऱ्यावर मास्क लावावे. विनामास्क घराबाहेर पडू नये. दोन व्यक्तींच्या मध्ये किमान सहा फुटांचे अंतर पाळावे. वारंवार साबणाने हात धुवावे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, तसेच आपल्या गावातील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी कळविले आहे.
......
मोहिमेत यांचा सहभाग महत्त्वपूर्ण
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह गावस्तरावर सरपंच, केंद्रप्रमुख, शिक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका यांनी लसीकरणासाठी विशेष प्रयत्न केले. उल्लेखनीय म्हणजे, शिक्षकांनी गावात फिरून ४५ वर्षे वयोगटांतील व त्यापुढील लोकांची गावात शोध मोहीमच राबविली. दरम्यान, त्यांना लसीकरणाचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
......
कोट
काेरोना लस पूर्णतः सुरक्षित असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. लसीकरणासाठी प्रयत्नशील असलेल्या त्या प्रत्यक्षात गावस्तरावर कार्य करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सर्वांनीच मोहिमेला सहकार्य करुन कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा संकल्पक करावा.
- प्रदीपकुमार डांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी