लसीकरण मोहिमेला लागतोय वारंवार ब्रेक, गरज दररोज ५०० डोसची मिळतात २००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:46+5:302021-05-10T04:28:46+5:30

गोंदिया : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचा भरसुद्धा लसीकरण मोहिमेवर आहे. अधिकाधिक प्रमाणात ...

Vaccination campaign requires frequent breaks, need 500 doses per day 200 | लसीकरण मोहिमेला लागतोय वारंवार ब्रेक, गरज दररोज ५०० डोसची मिळतात २००

लसीकरण मोहिमेला लागतोय वारंवार ब्रेक, गरज दररोज ५०० डोसची मिळतात २००

Next

गोंदिया : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचा भरसुद्धा लसीकरण मोहिमेवर आहे. अधिकाधिक प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे शासनाकडून जिल्ह्याला नियमित लसींचा पुरवठा होत नसल्याने वांरवार लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. लसीकरण मोहीम व्यापक स्तरावर राबविण्यासाठी जिल्ह्याला दररोज ५०० डोसची गरज आहे; पण पुरवठा केवळ २०० डोसचा होत आहे. अनेकदा तर तो सुद्धा पुरवठा होत नसल्याने मोहीम बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर येते. सध्या गोंदिया जिल्ह्याला कोविशिल्डचे ११ हजार डोस आणि कोव्हॅक्सीनचे ३४०० डोस प्राप्त झाले. त्यामुळे लसीकरण मोहिमेला थोडी गती आली. दररोज ६४८९ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे; पण लसीकरणाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हे डोसदेखील लवकरच संपण्याची शक्यता आहे. लसीकरण मोहीम अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी शासनाने लसींचा नियमित पुरवठा करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील बऱ्याच भागांत लसीकरण बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर गेल्यानंतर मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन व्यापक स्तरावर लसीकरण मोहिमेसाठी जिवापाड परिश्रम घेत आहेत. मात्र, शासनस्तरावरून लसींचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्याकडेसुद्धा काहीच पर्याय नसल्याचे चित्र आहे.

.............

१३० केंद्रांवरून लसीकरण सुरू

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील १४५ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर १८ ते ४० वर्षे वयाेगटातील नागरिकांसाठी वेगळी पाच केंद्रे सुरू केली आहेत. यासाठी ५ हजार लसींचे डोस उपलब्ध करून दिले आहेत; पण ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी लसींचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्याने सध्या केवळ १३० केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे.

.............

नागरिकही वैतागले

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मी माझ्या गावातील लसीकरण केंद्रावर दोनदा गेलो होतो; पण दोन्ही वेळेस लस उपलब्ध नसल्याने परत यावे लागले. लसीसाठी नोंदणी करूनदेखील लस उपलब्ध राहत नसल्याने अनेकांना परत जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने लसींचा पुरवठा नियमित करावा.

- रमेश ठाकरे, तिरोडा

.......

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मी कोविन ॲपवर नोंदणी केली. त्यानुसार त्यावर मिळालेल्या तारखेनुसार केंद्रावर लस घेण्यासाठी गेलो; पण लस उपलब्ध नसल्याचे सांगून तेथील कर्मचाऱ्यांनी नंतर येण्यास सांगितले. आता नंबर केव्हा येणार याची मी प्रतीक्षा करीत आहे.

- मनोज नागपुरे, लोधीटोला

......

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण असल्याने नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत आहेत. मात्र, नोंदणी केल्यानंतरही लस उपलब्ध राहत नसल्याने अनेकांना परत यावे लागत आहे. त्यामुळे शासनाने लसींचा पुरवठा करण्याची गरज आहे.

-मनोज राखडे, कार्तुुुली

................

१८ वर्षांपेक्षा जास्त वयाचेही आणि दुसरा डोस घेणारे ही येथेच येत असल्याने आरोग्य विभागाने लसीकरणादरम्यान गोंधळ उडू नये यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी खमारी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडवा उपकेंद्र, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, सडक अर्जुनी व अर्जुनी ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी व्यवस्था केली आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयासह १४५ केंद्रांवर व्यवस्था केली आहे.

.........

लसीकरणासाठी सकाळी ८ वाजेपासूनच रांगा

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शहरातील कुडवा येथील केंद्रावर १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रावर सकाळी ८ वाजेपासून युवकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका दिवशी एका केंद्रावरून १०० नागरिकांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

...........

एकूण रुग्ण :

कोरोनामुक्त :

लसीकरणाची टक्केवारी : ४५

.........

आतापर्यंतचे एकूण लसीकरण : १७५८७५

पहिला डोस : १४२७४७

दुसरा डोस : ३३१२८

आरोग्य कर्मचारी : १५१७५

फ्रंटलाइन वर्कर : २८५१०

..........................

४५ ते ६० वयोगट : ६४७००

६० वर्षांवरील : ६४५०७

१८ ते ४० वयोगट : २९८७

Web Title: Vaccination campaign requires frequent breaks, need 500 doses per day 200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.