अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळे मोजक्याच केंद्रावर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:45+5:302021-04-02T04:30:45+5:30
गोंदिया : कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून सर्वत्र (दि.१) सुरुवात झाली. ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण केले जात ...
गोंदिया : कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून सर्वत्र (दि.१) सुरुवात झाली. ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण केले जात आहे. जिल्हा आरोग्य विभागाने १०६ केंद्रावरुन कोरोना लसीकरणाचे नियोजन केले होते. मात्र कोवॅक्सीन लसीचा अपुरा साठा असल्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील काही मोजक्याच केंद्रावरुन लसीकरण करण्यात आले.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळेच लसीकरणाची मोहीम युध्द पातळीवर राबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये सुध्दा लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र त्या दृष्टीने नियोजन आणि लसीचा पुरवठा न झाल्याने गुरुवारी काही मोजक्याच केंद्रावरुन लसीकरणाची प्रक्रिया पार पडली. ककोडी, घोनाडीसह काही प्राथमिक आरोग्य केंद्राना कोवॅक्सीन लसीचा पुरवठा न झाल्याने त्या ठिकाणी लसीकरण होऊ शकले नाही. परिणामी या केंद्रावर लसीकरणासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील नागरिकांना लस न घेताच परतावे लागले. मात्र उर्वरित ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. जिल्हा आरोग्य विभागाने लसीकरणासाठी १ लाख २८ हजार ८०० कोविशिल्ड आणि दीड लाख कोवॅक्सीन लसीची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र यापैकी किती लस उपलब्ध होतात त्यावर जिल्ह्यातील लसीकरणाची गती अवलंबून असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
..............
आरोग्य विभागाचे नियोजन ढासळले
गुरुवारपासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरणास सुरुवात होणार होती. त्यामुळे त्या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करण्याची गरज होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज ५ हजारावर नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे नियोजन करताना दहा दिवस पुरेल एवढा लसीचा बफर स्टॉक उपलब्ध ठेवण्याची गरज होती. मात्र तसे करण्यात आले नाही. परिणामी अनेकांना लसीकरण केंद्रावरुन लस न घेताच परतावे लागले.