३.५० लाख जनावरांना दिली लाळखुरकत लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:00 AM2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:11+5:30
या आजारामध्ये तोंड व खुरात जखमा होतात, जनावर चारा खाणे बंद करतात, तोंडातून लाळ गळते, जनावर चालताना लंगडते, ताप येतो, थकवा जाणवतो, धाप लागते अशा प्रकारची लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडते. बाहेरच्या राज्यातून व बाहेरच्या जिल्ह्यातून धान हंगामासाठी जनावरांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरीत जनावरांमुळे या रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त वाढते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळखुरकत या संसर्गजन्य गंभीर आजाराच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १४ वी फेरी राबविण्यात आली आहे. हे लसीकरण संपूर्ण राज्यात एकाच वेळी मोहीम स्वरूपात राबविण्यात आले आहे. ३० आॅक्टोबरपासून राज्यात ही मोहीम पशुसंवर्धन विभागातंर्गत सुरू झाली असून, २९ नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील तीन लाख ५० हजार ७०८ जनावरांना लस देण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात गाय व म्हशींची एकूण संख्या चार लाखांच्या घरात आहे. लाळखुरकत हा गंभीर आजार असून, यालाच लाळे, पायखुरी व तोंडखुरी असेही म्हटले जाते.
या आजारामध्ये तोंड व खुरात जखमा होतात, जनावर चारा खाणे बंद करतात, तोंडातून लाळ गळते, जनावर चालताना लंगडते, ताप येतो, थकवा जाणवतो, धाप लागते अशा प्रकारची लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडते. बाहेरच्या राज्यातून व बाहेरच्या जिल्ह्यातून धान हंगामासाठी जनावरांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरीत जनावरांमुळे या रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त वाढते. यातून शेतीबरोबर दुग्ध व्यवसायासही मोठे आर्थिक नुकसान होते.
या रोगाला पायबंद घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव खात्रीशीर उपाय असल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात ३० आॅक्टोबरपासून ही मोहीम राबविण्यात आली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या श्रेणी-१ व २ च्या सर्व दवाखान्यांत लाळ्या खुरकतची लस उपलब्ध करविण्यात आली होती. जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक व उपायुक्त डॉ. संजय गायगवळी यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली. राज्य पशुसंवर्धन विभागाकडून ७१ हजार ५५६ तर जि.प.च्या पशु संवर्धन विभागाकडून दोन लाख ७९ हजार १५२ जनावरांचे जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यात, गोंदिया तालुक्यात २३ हजार ३१७, तिरोडा तालुक्यात १६ हजार १८३, आमगाव तालुक्यात सात हजार ६७३, देवरी तालुक्यात १९ हजार ५७८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार हजार ८०५ अशा एकूण तीन लाख ५० हजार ७०८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.