जिल्ह्यात फक्त २५ केंद्रांवरच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:34 AM2021-08-18T04:34:57+5:302021-08-18T04:34:57+5:30

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यावर शासन जोर देत आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही जोमात लसीकरण ...

Vaccination at only 25 centers in the district | जिल्ह्यात फक्त २५ केंद्रांवरच लसीकरण

जिल्ह्यात फक्त २५ केंद्रांवरच लसीकरण

Next

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यावर शासन जोर देत आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही जोमात लसीकरण मोहीम राबविण्यात आली व नागरिकांच्या सोयीसाठी सुमारे १९० लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र आजघडीला जिल्ह्यात फक्त २५ लसीकरण केंद्र सुरू असून केंद्र बंद पडल्याने नागरिकांची लसीसाठी धावपळ होत आहे. यामुळे लसीकरणाची आकडेवारी सातत्याने खालावत चालली असून यातून मात्र आरोग्य विभाग लसीकरणाला घेऊन किती गंभीर आहे याची प्रचिती येत आहे.

कोरोनाला मात देण्यासाठी अवघ्या देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली. दुसऱ्या लाटेने केलेला कहर बघता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करूनच कोरोनाला मात देण्यासाठी लसीकरणाची मोहीम एक चळवळ बनली. यात जिल्ह्याने सुरूवातीस चांगली कामगिरी करून दाखविली. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्र आदींमध्ये ही लसीकरणाला सुरूवात केली. शिवाय शहरात नगरपरिषदेच्या शाळांमध्ये ही लसीकरण सुरू होते. एवढेच नव्हे तर नागरिकांनी जनजागृती करीत विविध शिबिरांचे आयोजन व मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले. याचे फलित असे की, जिल्ह्याने ५० टक्के लसीकरणाचा टप्पा पार केला.

मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या घटविण्यात आली असून शनिवारी (दि. १४) फक्त २५ केंद्रांवरच लसीकरण करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, जिल्ह्याने ३ जुलै रोजी २१,४०८ नागरिकांच्या लसीकरणाचा रेकॉर्ड नोंदविला असतानाच आता सोमवारी (दि.१६) फक्त ६५० नागरिकांच्या लसीकरणाची नोंद आहे. केंद्रांची संख्या कमी होऊन फक्त २५ केंद्रांवरच लसीकरण सुरू असल्याने नागरिकांची लसीकरणासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळेच लसीकरणाची आकडेवारीही सातत्याने खालावत चालली आहे.

-------------------------------------

गोंदिया शहरात फक्त ३ लसीकरण केंद्र

शहरात आतापर्यंत केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालय, कुंभारे नगर आरोग्य केंद्र यासह नगर परिषदेच्या शाळा व अन्य ठिकाणी केंद्र सुरू करून लसीकरण केले जात होते. परिणामी नागरिकांना त्यांच्या भागातच लसीकरणाची सोय होती व झपाट्याने लसीकरण करवून घेण्यात आले. मात्र आता केटीएस रूग्णालय, कुभांरे नगर व मरारटोली या फक्त ३ केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे. यामुळे नागरिकांची धावपळ सुरू असून त्यांना लसीपासून वंचित रहावे लागत आहे.

-----------------------------

तिरोडा व गोरेगाव तालुक्यात एक ही केंद्र नाही

लसीकरण केंद्रांची संख्या घटविण्यात आली असतानाच शनिवारच्या तक्त्यांनुसार तिरोडा व गोरेगाव तालुक्यात एकही लसीकरण केंद्र नसल्याचे दिसले. अशात मात्र आता या तालुक्यातील नागरिकांनी लस घेण्यासाठी कोठे जावे असा प्रश्न पडतो. शिवाय आमदार तालुक्यात फक्त ग्रामीण रूग्णालयांमध्ये केंद्र दिसले व तेथे फक्त ७३ नागरिकांनी लस घेतल्याची नोंद आहे. यावरून जिल्ह्यात लसीकरणाची काय स्थिती आहे सांगण्याची गरज नाही.

-------------------------------

Web Title: Vaccination at only 25 centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.