जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांमध्येच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:31+5:302021-07-23T04:18:31+5:30
गोंदिया : देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. यात शासकीय लसीकरण केंद्रांवर अव्यवस्था होऊ नये या दृष्टीने ...
गोंदिया : देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. यात शासकीय लसीकरण केंद्रांवर अव्यवस्था होऊ नये या दृष्टीने खाजगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यात ६ खाजगी रुग्णालयांत सुरुवातीला लसीकरण करण्यात आले. मात्र, केंद्र शासनाने सर्वांनाच मोफत लसीची घोषणा केल्यानंतर आता या खाजगी रुग्णालयांतील लसीकरणाला पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. शिवाय, मध्यंतरी काही दिवस लसींचा तुटवडा होत होता. मात्र, आता लसींचा पुरवठा नियमित होत असल्याने लसीकरणाला पुन्हा एकदा गती आल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत ५४३९१८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
--------------------------------
- शासकीय रुग्णालयांत- २३०००
- खासगीत मात्र ०००
१) आरोग्य विभागाला गुरुवारी सायंकाळी १५००० कोविशिल्ड तर ८००० कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात आला आहे. आता त्यांचे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांना वितरण केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांकडे २३००० डोसेस आहेत.
२) लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हा शहरातील ५ व तिरोडा येथील १ अशा एकूण ६ खाजगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली होती. मात्र, सर्वांना मोफत लसीची घोषणा झाल्यानंतर आता खाजगी रुग्णालयांतील लसीकरण पूर्णपणे बंद असून त्यांच्याकडे लसी नाहीत.
----------------------
मध्यंतरी लसींचा तुटवडा असल्याने गावातील केंद्रात लसीकरण बंद होते. त्यामुळे लस घेता आली नाही. आता लसींचा पुरवठा सुरळीत झाल्याचे ऐकले असून लसीकरण सुरू झाले आहे. लवकरच जाऊन आपले लसीकरण करवून घेणार आहे.
- ममता पाऊलझगडे (किंडगीपार)
--------------------
लस घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी केंद्रावर गेलो होतो. तेव्हा लस नसल्यामुळे लसीकरण बंद असल्याचे कळले होते. आता लसीकरण पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे केंद्रांवर जाऊन लसीचा डोस घेणार आहे.
- राजू पटले (आमगाव)
------------------------------
कोट
लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हा खाजगी रुग्णालयांत लसीकरण केले जात होते. मात्र, आता जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांत लसीकरण पूर्णपणे बंद आहे. शिवाय मध्यंतरी लसींचा तुडवडा निर्माण झाल्याने काही दिवस लसीकरणाला खंड पडला. मात्र, आता लसींचा पुरवठा सुरळीत होत असून लसीकरण नियमित सुरू आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करवून घ्यावे.
- डॉ. भूमेश पटले
लसीकरण अधिकारी, गोंदिया
-------------------------------
पहिला डोस दोन्ही डोस एकही डोस न घेतलेले
१८ ते ४४ वयोगट १४१०२२ १०१५२ ४७३४०८
४५ ते ५९ १६८३५६ ४७४१६ ६५४९१
६० पेक्षा जास्त ९१४८० ३२१४६ ७४४७२