लस न मिळाल्याने लसीकरणाला गुरुवारी सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:51+5:302021-07-08T04:19:51+5:30
गोंदिया : जिल्ह्याला मंगळवारी (दि.६) रात्री कोरोना लसींचे डोस पुरविण्यात आल्याने बुधवारी (दि. ७) जिल्ह्यात लसीकरण पुन्हा एकदा सुरू ...
गोंदिया : जिल्ह्याला मंगळवारी (दि.६) रात्री कोरोना लसींचे डोस पुरविण्यात आल्याने बुधवारी (दि. ७) जिल्ह्यात लसीकरण पुन्हा एकदा सुरू झाले. मात्र, एवढे डोसेस सध्या एका दिवसातच संपत असल्याने व लसींचा पुरवठा करण्याबाबत काहीच माहिती न आल्याने गुरुवारी (दि. ८) लसीकरणाला पुन्हा सुटी राहणार असल्याचे दिसते.
जिल्ह्यात सध्या लसीकरणाला चांगलीच गती आली असून दररोज १५००० ते २०००० पर्यंत नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यात लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने लसीकरणात खंड पडत आहे. असे असतानाच मंगळवारी रात्री जिल्ह्याला कोव्हीशिल्डचे १६००० डोस मिळाले होते. त्यामुळे लसींचे वितरण करून बुधवारी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, १६००० हजार डोस आजघडीला एका दिवसात संपत असल्याने आता गुरुवारी लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्याला लसींचा पुरवठा होत असताना अगोदर माहिती दिली जाते व त्यानुसार जिल्ह्यातून गाडी नागपूरला पाठविली जाते. मात्र, बुधवारी तशी काहीच माहिती नसल्याने लसींचा पुरवठा होणार नाही असे दिसते. अशात गुरुवारी पुन्हा लसीकरण बंद पडणार असल्याची शक्यता आहे. शिवाय, बुधवारी काही लसीकरण केद्रांवर उरलेल्या डोसेसमधून जेवढे लसीकरण करता येणार तेवढेच होणार असल्याचेही दिसते.