जिल्ह्यातील लसीकरणाची गाडी येणार रुळावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:45+5:302021-05-07T04:30:45+5:30
गोंदिया : शासनाकडून लसींचे डोस प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात खंड पडला होता. गुरुवारी जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे ...
गोंदिया : शासनाकडून लसींचे डोस प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात खंड पडला होता. गुरुवारी जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस प्राप्त झाले. या डोसचे गुरुवारी सर्व १४५ केंद्रांना वितरण करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारपासून (दि. ७) जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची गाडी सुरळीतपणे रुळावर येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वपूर्ण ठरत आहे. लसीकरणाचा प्रतिसाद वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे व्यापक जनजागृतीसुद्धा केली जात आहे. त्यामुळेच आता नागरिक लसीकरणासाठी स्वत:हून पुढे येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १,६८,५४३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. पण, शासनाकडून जिल्ह्याला लसींचा नियमित पुरवठा करण्यात येत नसल्याने मोहिमेत वारंवार खंड निर्माण झाला होता. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा साठा संपला होता. त्यामुळे बुधवारी लसीकरणाची प्रक्रिया ठप्प पडली होती. परिणामी, लसीकरणासाठी केंद्रावर गेलेल्या नागरिकांना लस न घेताच परत यावे लागले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस प्राप्त झाले. त्यामुळे लसीकरण सुरळीतपणे सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्व १४५ केंद्रांवरून लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्याजवळील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार असल्याचे लसीकरण अधिकारी डॉ. भुमेश पटले यांनी सांगितले.
......
१८ ते ४४ वर्षांच्या नागरिकांचे लसीकरण सुरूच
जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांना पाच लसीकरण केंद्रांवरून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी ५ हजार लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. खमारी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडवा प्राथमिक उपकेंद्र, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत १,३४० नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.