आदिवासी भागातील नागरिकांचा लसीला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:26 AM2021-04-12T04:26:51+5:302021-04-12T04:26:51+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या १३०० वर जाऊन पोहचली असताना मात्र इळदा, राजोली व भरनोली या आदिवासी ...
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या १३०० वर जाऊन पोहचली असताना मात्र इळदा, राजोली व भरनोली या आदिवासी बहुल परिसरात लसीकरण मोहिमेला नागरिक ठेंगा दाखवित असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. याचे कारण जाणून घेतले असता आदिवासी भागातील लोकांची जीवनशैली कोरोना विषाणूला दूर सारत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातच नव्हे तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत लक्षणीय भर पडत असल्याचे दिसून येते. मात्र आदिवासी बहुल भाग समजला जाणाऱ्या इळदा, भरनोली व राजोली या गावांत कोरोनाला धुमाकूळ घालता आला नाही. याला कारण म्हणजे, आदिवासी भागातील जीवनशैली कारणीभूत असल्याने सांगण्यात आले. जंगलात वास्तव्याला असणारे आदिवासी बांधव काटक प्रकृतीचे असतात. शिवाय नैसर्गिकरित्या पिकविलेले सात्विक अन्नग्रहण करतात. त्यामुळे कोरोना संसर्गाला फारसा वाव मिळत नाही.
या भागातील लोकांचा वनौषधीवर अधिक भर असल्याने त्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते. शारीरिक श्रम, वनसंपत्ती असलेल्या रानभाज्या व फळे यांचा आहारात नेहमी उपयोग करीत असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती प्रबळ ठरली आहे. कोरोनावर प्रतिबंधात्मक लसीची त्यांना फारशी गरज वाटत नाही. त्यामुळे कोरोना लसीकरण पथक गावात येताच त्यांना ठेंगा दाखविल्याचे प्रकार घडत असल्याचे ऐकिवात आले आहे.