१४० केंद्रांवरून होणार १ मेपासून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:46+5:302021-04-28T04:31:46+5:30
गाेंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच त्यावरील रामबाण उपाय आहे. त्यामुळे शासनाने सध्या लसीकरणावर लक्ष केंद्रित केले ...
गाेंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच त्यावरील रामबाण उपाय आहे. त्यामुळे शासनाने सध्या लसीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४० केंद्रांवरून लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दररोज १० हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ते साध्य कसे होईल आणि नागरिकांचा याला व्यापक प्रतिसाद कसा मिळेल यासाठी लसीकरणाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत फ्रंटलाइन वकर्स तसेच ४५ वर्षांवरील एकूण १ लाख ४८ हजार ५६३ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक असून जवळपास २० हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
.............
१ मेनंतरचे काय नियोजन
- जिल्ह्यात सध्या १४० केंद्रांवरून कोराेना लसीकरण सुरू आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी केंद्राची संख्या वाढवून दररोज १० हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
- लसीकरण मोहीम सातत्याने चालू राहावी यासाठी लसींचा साठा उपलब्ध कसा राहील यादृष्टीने लसीची मागणी केली जात आहे.
- लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुढे यावे यासाठी आशा सेविका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
........
कोट
जिल्ह्यात १ मेपासून व्यापक स्तरावर लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज १० हजार नागरिकांना कसे लसीकरण करता येईल यादृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे.
- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी
.............
अशी आहे आकडेवारी
सध्या सुरू असलेले केंद्र : १४०
जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्र : १४०
दररोज लस देण्याचे टार्गेट : १५००० लस
दररोज प्रत्यक्षात किती जणांना लस : ७०००
............
आतापर्यंत किती टार्गेट पूर्ण : ४५ टक्के
.............
१ : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ११ हजार फ्रंटलाइन वकर्संना लसीकरण करण्यात आले. यापैकी बऱ्याच जणांना लसीचा दुसरा डोस देखील देण्यात आला आहे. त्यामुळे फ्रंटलाइन वकर्सना लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
२: कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. यात ४० हजारांवर ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले असून लसीकरणात ते अग्रेसर आहेत.
३: आतापर्यंत जवळपास ४ लाख नागरिकांना लसीकरणाचे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, मध्यल्या काळात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने मोहिमेला ब्रेक लागला होता. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही.
............