लस आली, पण लसीकरणाचे सर्व्हर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:09+5:302021-04-11T04:28:09+5:30
गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोरोना लसींचा साठा संपल्याने लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.९) ९९२० ...
गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोरोना लसींचा साठा संपल्याने लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.९) ९९२० कोव्हॅक्सिन लसींचे डोस प्राप्त झाले. डोसचे सर्व १४० केंद्रांना वितरण करण्यात आले. पण शनिवारी लसीकरणाचे सर्व्हर सकाळपासूनच डाऊन असल्याने लसीकरणाची प्रक्रिया ठप्प होती.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे याचा कोविड लसीकरणावर परिणाम झाला होता. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आले, तर अजून ३ लाख १५ हजार नागरिकांना लसीकरण होणे शिल्लक आहे. यासाठी ३ लाख १८ हजार लसींची गरज आहे. जिल्हा आरोग्य विभागाने शासनाकडे लसींची मागणी केली. मंगळवारी जिल्ह्यातील लसींचा साठा पूर्ण संपल्याने बुधवारपासून लसीकरण माेहीम पूर्णपणे ठप्प झाली होती. शुक्रवारी जिल्ह्याला काही प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होईल अशी शक्यता होती. पण केवळ ९९२० कोव्हॅक्सिन लसींचा साठा उपलब्ध झाला. हा साठा जिल्ह्यातील सर्व १४० लसीकरण केंद्रांना वितरित करण्यात आला. पण शनिवारी सकाळपासून लसीकरणाचे सर्व्हर डाऊन असल्याने नोंदणी होत नव्हती. त्यामुळे दुपारी २ वाजतापर्यंत लसीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. सर्वर डाऊनची समस्या केवळ गोंदिया जिल्ह्यात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली होत असे आरोग्य विभागाच्या सूृत्रांनी सांगितले. जिल्ह्यात दररोज दहा हजारांवर नागरिकांना लसीकरण केले जाते. त्यामुळे प्राप्त झालेल्या ९९२० डोस साठा किती दिवस पुरेल याबाबत शंका आहे, तर केवळ कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाल्याने काेविशिल्डचा साठा केव्हापर्यंत मिळेल याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.
............
लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याने चिंतेत वाढ
जिल्ह्यात दररोज ५००हून अधिक कोरोना बाधितांची भर पडत आहे. रुग्ण संख्येचा आकडा दररोज फुगत आहे. अशात कोरोना लसीकरण हे प्रभावी समजले जात होते. पण लसींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीमदेखील ठप्प झाली आहे. त्यामुळे लसीकरणाला घेऊन नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
.......