पोलीस आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 05:00 AM2021-02-07T05:00:00+5:302021-02-07T05:00:22+5:30
कोरोना लसीकरणांतर्गत सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून त्यानुसार त्यांचे लसीकरण सुरू आहे. मात्र यासोबतच अन्य विभागांचाही आता समावेश करून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी ४२९ कर्मचाऱ्यांची पहिली यादी तयार असून शुक्रवारपासून त्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातही जोमात लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आता पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही लस दिली जात आहे. यासाठी ४२९ कर्मचाऱ्यांची पहिली यादी तयार झाली असून त्यांना शुक्रवारी (दि.५) लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आता आणखी लसीकरण केंद्र वाढविले जाणार आहेत.
कोरोना लसीकरणांतर्गत सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून त्यानुसार त्यांचे लसीकरण सुरू आहे. मात्र यासोबतच अन्य विभागांचाही आता समावेश करून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यासाठी ४२९ कर्मचाऱ्यांची पहिली यादी तयार असून शुक्रवारपासून त्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे, तर जिल्हाधिकारी कार्यालयातील ४५० कर्मचाऱ्यांची यादी तयार असून आरोग्य कर्मचारी आटोपल्यानंतर त्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, सध्या लसीकरणासाठी ७ केंद्र सुरू आहेत. शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांचा यात समावेश आहे.
४७१९ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली व तेव्हाच सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असे ठरले होते. त्यानुसार, जिल्ह्यात ८४२८ आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे लसीकरण सुरू आहे. याअंतर्गत आतापर्यंत ४७१९ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर आटोपून त्यानंतर अन्य विभागांच्या लसीकरणाला गती दिली जात आहे.
——————————————
सोमवारपासून सालेकसा व गोरेगाव येथे केंद्र
जिल्ह्यात सध्या ७ केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस देणे गरजेचे असून त्यांचे लसीकरण झाल्यानंतरच अन्य विभागांचा लसीकरणासाठी समावेश करता येणार आहे. शिवाय ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सोयीचे व्हावे यासाठी आता सोमवारपासून सालेकसा व गोरेगाव केंद्र सुरू केले जाणार असल्याने येथेही लसीकरणाला सुरुवात होणार आहे.