कौतुकास्पद! अवघ्या २२ व्या वर्षी तरुणीची मिनी मंत्रालयात एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 03:46 PM2022-01-21T15:46:40+5:302022-01-21T18:32:14+5:30
यंदाची निवडणूक आता पार पडली असून यात कित्येकांचे स्वप्न धुळीस मिळाले, तर कित्येकांना थेट आकाशात उंच भरारी मिळवून दिली आहे.
गोंदिया : जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली असून आता सत्ता स्थापनेसाठी लगबग सुरू आहे. मात्र या निवडणुकीत कित्येक दिग्गजांना जेथे बाहेरचा रस्ता घ्यावा लागला आहे, तेथेच कधी कल्पना न केली असलेल्यांना थेट मिनी मंत्रालयात एंट्री मिळाल्याचे धक्कादायक व आश्चर्यकारक निकालही लागले आहेत. यात अवघ्या २२ व्या वर्षीच मिनी मंत्रालयात एंट्री मारणारी वैशाली पंधरे सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
राजकारण म्हटले म्हणजे भले भले दुरूनच रामराम ठोकतात. राजकारण आपल्यास झेपणारे नाही, असे बोलून त्याकडे पाठ फिरविणारेही कित्येकजण आहेत. मात्र याच राजकारणातून आपली ओळख निर्माण करणारेही कित्येक आहेत. येथे मात्र जिल्हा परिषदेचे राजकारण म्हणजे थेट मिनी मंत्रालयावर चढाई असेच आहे. यंदाची निवडणूक आता पार पडली असून या निवडणुकीने मात्र कित्येकांचे स्वप्न धुळीस मिळविले आहे, तर कित्येकांना थेट आकाशात उंच भरारी मिळवून दिली आहे.
याचा प्रत्यय येत आहे, तो तालुक्यातील पांजरा येथून निवडून आलेल्या वैशाली पंधरे या तरुणीला बघून. अवघ्या २२ वर्षांची वैशाली बी.एस्सी. पदवीधारक असून सध्या ती स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. पांजरा क्षेत्र अनु. जमाती महिलांसाठी राखीव आहे. अशात ग्रामपंचायत सदस्य राहिलेल्या तिच्या वडिलांची इच्छा होती की, तिने ही निवडणूक लढवावी. यामुळे चाबी संघटनेकडून ती रिंगणात उतरली व तिने बाजी मारत थेट मिनी मंत्रालयात एंट्री घेतली आहे. तिची एक बहीण सशस्त्र सीमा बलामध्ये आहे. घरी आई-वडील व दोन भाऊ आहेत. आता मिळालेल्या संधीचे सोने करायचे असून आपल्या क्षेत्राचा विकास करायचा आहे. मतदारांनी टाकलेल्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी प्रयत्न करणार, असे वैशालीने ‘लोकमत’ला सांगितले.
दिग्गजाला नमवून श्रीकांत विजयी
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी या जागेवरून अवघ्या २७ वर्षांचा तरुण श्रीकांत घाटबांधे हा निवडून आला आहे. बी.ए. पदवीधारक श्रीकांत सामाजिक कार्यात पुढे राहतो. यातूनच त्याने माजी सभापती प्रकाश गहणे यांच्यासारख्या दिग्गजाला पराभूत करून मिनी मंत्रालय गाठले आहे. सध्या क्षेत्रात श्रीकांतही चर्चेचा विषय बनला आहे.