आमगावची वैष्णवी शेेंडे जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 01:04 AM2017-05-31T01:04:14+5:302017-05-31T01:04:14+5:30
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ९०.४० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ९०.४० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिने जिल्ह्यात सर्वाधिक ९५.५४ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तसेच अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी भ्रमर संजय पुस्तोडे याने ९४.३० टक्के गुण घेऊन द्वितीय तर तिसरा क्रमांक आमगावच्या आदर्श कनिष्ठ विद्यालयातील कस्तूरी विनायक अंजनकर हिने ९३.६९ टक्के गुण घेऊन पटकाविला आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील २२ हजार ४३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र प्रत्यक्षात २२ हजार ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात नागपूर विभागीय मंडळात गोंदिया जिल्हा यावर्षी दुसऱ्या स्थानावर आहे. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १० हजार ३८६ विद्यार्थी कला शाखेचे होते. त्यापैकी ८८०३ विद्यार्थी (८४.७६ टक्के) उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेतून १० हजार २४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९९१९ (९६.७९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तसेच वाणिज्य शाखेतून ९६४ पैकी ८५८ (८९ टक्के) तर व्होकेशनल शाखेतून परीक्षा देणाऱ्या ४३३ पैकी ३३७ (७७.८३) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षीही मुलींनी बाजी मारत मुलांपेक्षा आम्ही सरस आहोत, हे सिद्ध केले. परीक्षा देणाऱ्या १० हजार ८७७ मुलांपैकी ९६३८ मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर ११ हजार १५४ मुलींपैकी १० हजार २८९ मुलींनी यश मिळविले आहे. यंदा केवळ १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यात ग्रामीण भागातील शाळा जास्त आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा चार टक्क्याने निकालात पुढे आला आहे. तर यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून सर्वाधीक ९३.८३ टक्के निकाल लागला असून द्वितीय क्रमांकावर आमगाव तालुका ९३.५३ टक्यावर आहे. निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे मागील वर्षी नागपूर विभागात तृतीय क्रमांकावर असलेला गोंदिया जिल्हा यंदा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
वैष्णवी शेंडेला व्हायचयं डॉक्टर
आमगाव : बारावी विज्ञान शाखेतून आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिने डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वर्ग एक ते चार पर्यंतचे तिचे शिक्षण के.के.इंग्रजी शाळेत घेतले असून ती इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण आदर्श विद्यालयातच घेत आहे. कठीण परिश्रम व आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळविता येते असे वैष्णवीने लोकमतशी बोलताना सांगीतले.
भवभूती शिक्षण संस्थेच्या रूपात स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर गुरूजींनी लावलेले रोपटे आज विशाल वटवृक्ष झाले आहे. माजी आमदार केशवराव मानकर यांच्या नेतृत्वात तसेच सुरेशबाबू असाटी यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या आदर्श विद्यालयाने डॉक्टर, इंजिनीयर, नेते, पत्रकार व सर्वोच्च पदावर जाणारी सर्वच माणसे घडविली आहे. आमगावच्या या विद्यालयातील विद्यार्थी अनेकदा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवितात. उत्कृष्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे येथील निकाल चांगला असतो. निकाल लागताच प्राचार्य दिनेश राऊत, उप प्राचार्य अश्वीनी जोशी, पर्यवेक्षक सि.बी.पारधी व शोभा येडे यांनी वैष्णवीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.