ग्रामीण भागातील वैष्णवीची एमएससीमध्ये झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:29 AM2021-04-16T04:29:35+5:302021-04-16T04:29:35+5:30
संजय कुमार बंगळे अर्जुनी मोरगाव : मानवाला प्रगतीचे, प्रतिभेचे पंख लाभले की त्याची झेप अवकाशाच्याही पलीकडे जाते. शहरी ...
संजय कुमार बंगळे
अर्जुनी मोरगाव : मानवाला प्रगतीचे, प्रतिभेचे पंख लाभले की त्याची झेप अवकाशाच्याही पलीकडे जाते. शहरी भागातील विद्यार्थी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागाच्या दृष्टीने ते जरा पुढेच राहतात; परंतु अशी कुठलीही सोयसुविधा नसताना केवळ जिद्द, चिकाटी व सातत्य या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी पिंपळगाव या छोट्याशा गावातील वैष्णवी देवानंद खोटेले हिने एम. एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र विषयात नागपूर विद्यापीठातून अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.
वैष्णवीने विद्यापीठातून ८२.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागापेक्षा कुठेही मागे नाहीत, हे तिने दाखवून दिले आहे. आजपर्यंत एम. एस्सी.मध्ये प्रथम येण्याचा मान शिवाजी सायन्स महाविद्यालयाचा होता; परंतु हा पायंडा मोडीत काढून वैष्णवीने तायवाडे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिने आपले पदव्युत्तर शिक्षण कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयात पूर्ण केले. चारही सेमिस्टरमध्ये ती प्रथम आली आहे. सत्र २०२०-२१ नागपूर विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्र एम. एस्सी.च्या अभ्यासक्रमात ती अव्वल आली आहे. महाविद्यालयाने वैष्णवीला बेस्ट स्टुडंट अवॉर्डने सन्मानित केले आहे. तिने आपले प्राथमिक शिक्षण स्वगावी खांबी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले; तर माध्यमिक शिक्षण बोंडगावदेवी येथील मानवता महाविद्यालयात घेतले आहे. विद्यापीठाच्या वतीने होणाऱ्या दीक्षांत समारोहात वैष्णवीला सन्मानित करण्यात येणार आहे. सध्या वैष्णवी ‘तांदळाच्या पिठापासून अल्कोहोलची निर्मिती’ या विषयात संशोधन करीत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैष्णवीने मिळविलेले हे यश गावासाठी भूषण ठरले आहे. तिच्या या यशाबद्दल तालुक्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.