वाजपेयींचे गोंदिया जिल्ह्याशी घनिष्ठ नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:02 PM2018-08-16T22:02:51+5:302018-08-16T22:03:18+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे होते. यामुळे भाजपाच्या अनेक नेत्यांची जिल्ह्यात तेव्हा रेलचेल होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गोंदिया जिल्ह्याला निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तीनदा भेट दिली. त्यांचे जिल्ह्यातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांशी घनिष्ठ नाते संबंध होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वच जण नि:शब्द झाले. अनेकांनी त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. कार्यकर्त्यांशी थेट नाड असणार नेता म्हणजे वाजपेयी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे १९७८ मध्ये निवडणूक प्रचारार्थ प्रथम गोंदिया येथे आले होते. त्यानंतर माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या निवडणूक प्रचारार्थ १९९१ आणि १९९६ मध्ये नारायणदास सराफ यांच्या प्रचारार्थ ते गोंदियाला आले होते. या वेळी गोंदिया येथील सध्याच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली होती. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील अनेक भाजपाच्या जेष्ठ नेत्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. गोंदिया येथील विश्रामगृहात त्यांनी तेव्हा स्थानिक पत्रकार आणि भाजपा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. डॉ. राधेश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली होती. तर आमगाव येथील माजी खासदार महादेवराव शिवणकर यांच्या निवासस्थानी भेट देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. निवडणूक प्रचारार्थ त्यांची जिल्ह्यात झालेली भाषणे अद्यापही जिल्हावासीयांच्या स्मरणात आहेत. भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयी यांच्या योगदानामुळेच भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला. गोरगरीब, शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
मौत की उमर क्या है
दो पल भी नही
जिंदगी का सिल सिला
आज है कल नही
या कवितेच्या चार ओळी आजही जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या स्मरणात आहेत. यावरुन त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची कार्यकर्त्यांवर किती छाप होती हे दिसून येते. अटलबिहारी वाजपेयी यांनी जिल्ह्याला केवळ तीनदा भेट दिली असली तरी या महान नेत्याच्या भेटीच्या आठवणी अद्यापही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आजही स्मरणात आहे. त्यामुळे त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांजवळ शब्द नव्हते. यावरुन या महान नेत्याचे कार्य कळत असल्याचे डॉ. राधेश्याम अग्रवाल (बबली) यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.