वंदे भारत ट्रेनमध्ये असणार अत्याधुनिक सुविधा; ११ डिसेंबरपासून धावणार गाडी, प्रवाशांमध्ये उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 01:49 PM2022-12-09T13:49:26+5:302022-12-09T13:54:42+5:30
प्रवास भाडे अद्याप निश्चित नाही
गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागांतर्गत येत्या ११ डिसेंबरपासून बिलासपूर ते नागपूरदरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे प्रवाशांना बरेच आकर्षण असून, या ट्रेनमध्ये नेमक्या काय काय सुविधा आहेत याला घेऊन उत्सुकता आहे. ही ट्रेन पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली असून, यात प्रवास अधिक आरामदायक व्हावा यासाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.
ही ट्रेन सेमी हायस्पीड असून, यात विमानासारखे वातावरण अनुभवता येणार आहे. या गाडीच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये प्रवासी आपली चेअर १८० डीग्रीपर्यंत फिरवू शकतील. त्यामुळे प्रवाशांना ज्या दिशेला बसायचे आहे, त्या दिशेला बसता येणार आहे. या गाडीचे दरवाजे हे ॲटोमेटिक उघडणार आहेत. विशेष म्हणजे या गाडीचे सर्व दरवाजे बंद झाल्यावरच ही गाडी पुढे जाईल आणि गाडी थांबल्यावरच या गाडीचे दरवाजे उघडतील.
वंदे भारत ट्रेनला एकूण १६ डबे राहणार असून, सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. या ट्रेनमध्ये इंटरनेट आणि वायफायची सुविधा असणार असून, प्रवासी आपल्या मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर करू शकणार आहेत. या गाडीचे नेमके प्रवास भाडे किती असणार हे अद्याप रेल्वे विभागाने जाहीर केले नाही. या गाडीत नास्ता आणि जेवणाचीसुद्धा सुविधा असणार आहे. हे दरसुद्धा तिकिटासोबत निश्चित केले जाणार असल्याची माहिती आहे. क्लास वन डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटातच नास्ता आणि जेवणाचे पैसे आधीचे जोडले जाणार असून, त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे.
दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअरची सुविधा
वंदे भारत ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. इतर ट्रेनमध्ये जशी बरेचदा असुविधा आणि अस्वच्छता दिसून येते तसा प्रकार वंदे भारत गाडीत पाहायला मिळणार नाही. त्यासाठी विशेष काळजी रेल्वे विभागाने घेतली असल्याची माहिती आहे.
प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधांवर भर
वंदे भारत ट्रेनच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शिवाय या गाडीचे दरवाजे हे रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर उघडतील. आउटवर किंवा इतर ठिकाणी गाडी थांबल्यावर त्यात असामाजिक तत्त्व तसेच चोर प्रवेश करून प्रवाशांना त्रास देत असल्याचे प्रकार पाहायला मिळतात. मात्र, वंदे भारत गाडीत या प्रकारांची पुनरावृत्ती होणार नसून प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधांवर पूर्णपणे भर देण्यात आला आहे.
गाडी पोहोचली बिलासपूरला
वंदे भारत गाडीचा शुभारंभ ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते होणार आहे. ही गाडी तयार होऊन दिल्लीवरून बुधवारी बिलासपूर येथे दाखल झाली. ही गाडी पाहण्यासाठी बुधवारी या मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी केली होती.
असे आहे वेळापत्रक
वंदे भारत गाडीचा शुभारंभ ११ डिसेंबर रोजी होणार आहे. रेल्वे विभागाने या गाडीचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार ही गाडी बिलासपूर रेल्वे स्थानकावरून सकाळी ६:४५ वाजता सुटेल. रायपूर सकाळी ८:०६ वाजता, दुर्ग ८:४५ वाजता, गोंदिया १०:३० वाजता नागपूर येथे आणि दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल. तर नागपूरवरून दुपारी २:०५ वाजता बिलासपूरसाठी रवाना होईल. गोंदियाला ३:४६ वाजता पोहोचेल. दुर्ग सायंकाळी ५:३० वाजता, रायपूर ६:०६ वाजता व बिलासपूरला सायंकाळी ७:३५ वाजता पोहोचेल.