बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंती समारंभानिमित्त विविध कार्यक्रम
By admin | Published: April 14, 2016 02:32 AM2016-04-14T02:32:26+5:302016-04-14T02:32:26+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती समारंभाचे आयोजन नगरातील बौद्ध उपासक-उपासिका तथा एकता मंचच्या वतीने ...
अर्जुनी मोरगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती समारंभाचे आयोजन नगरातील बौद्ध उपासक-उपासिका तथा एकता मंचच्या वतीने गुरूवार (दि.१४) करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध धम्म प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
अखिल मानवजातीला स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शकतोत्तर १२५ वी जयंती देशासह जगात विविध कार्यक्रमांनी साजरी केली जात आहे. नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व एकता मंचच्या वतीने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचा मानस आहे.
गुरूवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड-६ मधून भव्यदिव्य अशा धम्मरॅलीचे शुभारंभ सकाळी ७.३० वाजता होणार आहे. वार्ड-६ मधील विहारात धम्मध्वजारोहण करून व त्रिशरण, पंचशील ग्रहण करून धम्मरॅली डॉ. आंबेडकर टोलीवार्ड, हातझाडे मोहल्ला, रेल्वे फाटकवरून आनंद बुद्ध विहार, सिव्हिल लाईन्स, समता कॉलनी, सिंगलटोली मार्गाने गणेशनगर बरडटोली येथे रॅलीचे रूपांतर मुख्य समारंभात होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती गणेशनगर येथे समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगर पंचायतचे अध्यक्ष पौर्णिमा शहारे राहणार आहेत. अतिथी म्हणून तहसीलदार डी.सी. बांबोर्डे, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, ठाणेदार नामदेव बंडणकर उपस्थित राहतील. तर धम्म मार्गदर्शक म्हणून पालक मैत्री अभियान नागपूरच्या संयोजिका प्रा. संध्या पवार, सोशियल मुव्हमेंट लाखणीचे अध्यक्ष प्रा. सुरेश खोब्रागडे, प्रबोधनकार शुद्धोदन शहारे उपस्थित राहणार आहेत. (शहर प्रतिनिधी)