वरुणदेवा, कृपा असू दे

By admin | Published: June 14, 2015 01:52 AM2015-06-14T01:52:20+5:302015-06-14T01:52:20+5:30

दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीने तर गेल्यावर्षी अल्पवृष्टीने होरपळलेले शेतकरी यावर्षी तरी समतोल पाऊस येईल ...

Varundev, please be gracious | वरुणदेवा, कृपा असू दे

वरुणदेवा, कृपा असू दे

Next

गोंदिया : दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीने तर गेल्यावर्षी अल्पवृष्टीने होरपळलेले शेतकरी यावर्षी तरी समतोल पाऊस येईल आणि शेतात डौलाने पिक उभं राहील यासाठी वरुणदेवाला प्रार्थना करीत आहेत. पावसाने अजून जिल्ह्यात हजेरी लावलेली नसली तरी शेतीचा जुगार खेळण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानात शेतीला आधुनिकतेची जोड दिली जात असली तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. महागडे बियाणे, कीटकनाशके, खतांच्या वाढलेल्या किमती, मजुरीचा ताळमेळ जुळवताना कधीतरी आपल्याही घरात संपन्नता नांदेल याच आशेवर शेतकरी पुन्हा एकदा काळ्या मातीत हिरवं स्वप्नं रंगवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
गोंदिया : यावर्षी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १.९५ लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. मुख्यता भाताच्या वाणाचे ४४ हजार क्विंटल भात बियाणे तालुकानिहाय विक्री केंद्रावर उपलब्ध करवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीजसोबतच इतर खासगी कंपन्याही बियाण्यांच्या बाजारात आपले अस्तित्व वाढवून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याच्या कामात गुंतल्या आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शासनाकडून ५८ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुकानिहाय कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश सबंधितांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समितीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करते वेळी अधिकृत कंपन्यांचे व अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके खरेदी करावे. खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाची पक्की पावती प्राप्त करून घ्यावी. बॅग/कंटेनरवर छापील किंमती पेक्षा जास्त रक्कम अदा करू नये. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी केले आहे.
कमी लागवड खर्चासाठी प्रयत्न करावा
शेतकरी केवळ उत्पन्न वाढविण्यासाठी रासायनिक खताचा अधिक वापर करीत नाही. आजसुद्धा शेवाल, गांढूळ खत बनविण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. परंतु शेतकरी याचा लाभ घेत नाही. या प्राकृतिक खतांमुळे जमिनीची उत्पादकता वाढते. तसेच खतासाठी होणार खर्च कमी केला जावू शकतो. मानसूनची अनिश्चितता, पिकांवर रोग, वाढती रासायनिक खताची किमत या तीन बाबी लक्षात ठेवून उत्पादन खर्च कमी करूनच शेतकऱ्यांना आता आपला लाभ वाढवावा लागेल. शेतीलासुद्धा एक उद्योग समजून लाभ-हानी लक्षात ठेवून शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे.
भरारी पथक व सनियंत्रण कक्ष झाला सक्रीय
जिल्ह्यात सद्यस्थितीत एक हजार ५९३ कृषी केंद्र कार्यरत असून त्यामध्ये रासायनिक खताचे ८८९, बियाणे ४१५ व किटकनाशके ३९५ निविष्ठा विक्री केंद्र कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्य प्रतीचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके उपलब्ध होणाच्या दृष्टीने जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांच्या अध्यक्षतेत एकूण नऊ भरारी पथके व संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा व तालुकास्तरावर व्यापक प्रमाणात कृषी केंद्रांची तपासणी करणे व त्रुट्या आढळून आल्यास कार्यवाही करणे सुरूही केले आहे.
सात कृषी केंद्रांवर विक्रीबंदी
शेतीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री करताना नियमांचे पालन न केल्याने आगमाव व सालेकसा तालुक्यातील सात कृषी केंद्रांवर सोमवारी भरारी पथकाने कारवाई करीत विक्रीबंद केली. भरारी पथकाने कृषी केंद्रांची तपासणी केली. त्यात आमगाव तालुक्यातील चेतन कृषी केंद्र आमगाव, परमात्मा एक कृषी केंद्र आमगाव आणि माँ बम्बलेश्वरी कृषी केंद्र आमगाव, सालेकसा तालुक्यातील अंबुले कृषी केंद्र सालेकसा, माँ बम्बलेश्वरी कृषी केंद्र सालेकसा, खरेदी विक्री सोसायटी सालेकसा आणि किसान कृषी साकरीटोला या केंद्रावर अनियमितता आढळली. स्टॉकची नोंदणी नसणे, रेट बोर्ड नसणे, मालाचा रेकॉर्ड नसणे अशा विविध कारणांसाठी दोषी ठरविले.

Web Title: Varundev, please be gracious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.