ठिंबक सिंचनातून ‘खोबा’ बनले भाजी उत्पादक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:42 AM2017-07-21T01:42:43+5:302017-07-21T01:42:43+5:30
सध्या शेती करणे शेतकऱ्यांसाठी सोपे नाही. परंतु जेव्हा त्याची ईच्छाशक्ती दृढ असेल व शासकीय सहकार्य
आत्मा प्रकल्पाची मदत : १४५ क्विंटल उत्पादनातून १.३० लाखांचे उत्पन्न
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या शेती करणे शेतकऱ्यांसाठी सोपे नाही. परंतु जेव्हा त्याची ईच्छाशक्ती दृढ असेल व शासकीय सहकार्य मिळत असेल तर ओसाड भूमिमध्येसुद्धा पीक घेतले जावू शकते. हा यशस्वी प्रयोग देवरी तालुक्यातील कवलेवाडा-पिंडकेपार येथील शेतकरी हिरालाल लहानू खोबा यांनी सिद्ध करून दाखवून शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.
कृषी विभागाद्वारे २०१३-१४ मध्ये तालुक्याच्या सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनाच्या आधारावर भाजीपाला लागवडीसाठी निवड करण्यात आली. तालुक्यात प्रशिक्षणाचे आयोजन करून भाजीची शेती करण्यासाठी जानजागृती करण्यात आली. शेती शाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाने हिरालाल यांना शहरी क्षेत्रात भाजी पुरवठा योजनेचे महत्व पटवून दिले. ठिंबक सिंचन योजनेतून पाण्याच्या बचतीबाबत माहिती देण्यात आली. खोबा यांना भाजीच्या शेतीसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले. त्यांनी आत्मा अंतर्गत जैन इरिगेशनचा दौरा करून तेथील ठिंबक सिंचनाचे प्रशिक्षण घेतले. तसेच वाराणसी येथेसुद्धा जावून प्रशिक्षण घेतले. खोबा यांच्या शेताचा दौरा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्य काळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी. शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आत्माचे संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. सर्व अधिकारी चिखलाची तमा न बाळगता खोबा यांच्या शेतात गेले व भाजी शेतीचे निरीक्षण केले. पारंपरिक धान शेतीला बगल देवून खोबा यांनी भाजीपाल्याची लागवड करुन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवल्याबद्दल कौतुक केले.
पूर्वी धानाचे पीक
कवलेवाडा येथील खोबा सुरूवातीला ते धानाची शेती करीत होते. त्यात नफा होत नसल्याने त्यांनी सुधारित तंत्राचा अभ्यास केला. कमी वेळेत व कमी पाण्यात अधिक लाभासाठी ठिंबक सिंचनातून भाजीपाला पीक लावण्याचा निर्धार केला. ०.८० हेक्टरमध्ये ठिंबक सिंचानाचे यंत्र बसविले. त्यावर त्यांनी ६२ हजार ०१७ रूपयांचा खर्च केला. ठिंबक सिंचनातून त्यांनी वांगी, टमाटर, भेंडी, कारले व चवळीच्या शेंगाची लागवड केली. खत-बियाणे व औषधांवर ३० हजार रूपये खर्च झाले. या हंगामात ऋतूत त्यांनी ३० क्विंटल भिंडी, ५० क्विंटल वांगी, ४० क्विंटल टमाटर, १० क्विंटल चवळी व १५ क्विंटल वालाचे उत्पादन घेवून एक लाख ३० हजार रूपयांच्या भाजीपाल्याची विक्री केली. त्यांना एक लाख रूपयांचा नफा झाला.
आठवड्यातून चार बाजार
खोबा यांनी सांगितल्यानुसार, ते पूर्वी चार एकरात धान शेती करीत होते. आता पाऊन एकरमध्ये भाजी पीक घेतले जात आहे. आठवड्यातून चार वेळा ते आपले उत्पादन बाजारात नेतात. प्रत्येक वेळी तीन हजार रूपयांची विक्री होते. भाजीला लागणाऱ्या पाण्यासाठी १०० फूट खोल बोअरवेल खोदली. अशाच प्रकारे परसराम गरीबसिंह बागडेरिया यांनीसुद्धा एक एकरमध्ये भाजीचे पीक लावले आहे. त्यांना ५० हजार रूपयांचा लाभ मिळत आहे. खोबा यांच्यानुसार, शासनाद्वारे काही मदत देण्यात आली नाही. राहण्यासाठी व्यवस्था नाही. शेतीच्या कंपाऊंडसाठी तारांची आवश्यकता आहे.