महिलांनी पकडले दारुची तस्करी करणारे वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:55 AM2019-03-09T00:55:46+5:302019-03-09T00:56:07+5:30
तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील महिलांनी दारुची तस्करी करणाऱ्या वाहनासह दारुची विक्री करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी जागतिक महिला दिनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील महिलांनी दारुची तस्करी करणाऱ्या वाहनासह दारुची विक्री करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी जागतिक महिला दिनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
तिल्ली मोहगाव हे गाव दारुबंदी घोषीत आहे. मात्र काही दारु विक्रेते या गावात अवैध दारु विक्री करण्याचा प्रयत्न करतात. गावात पूर्णपणे दारुबंदी करण्यासाठी महिलांनी दारुबंदी समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून अवैध दारु विक्रेत्यांवर नजर ठेवून कारवाही केली जात आहे. शुक्रवारी (दि.८) सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका नॅनो कारमधून दारुची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती दारुबंदी समितीच्या महिलांना मिळाली. यानंतर त्यांनी गावातील मार्गावर या वाहनावर नजर ठेवली. दरम्यान एका नॅनो कारने गावात प्रवेश केला. ही कार तिल्ली मोहगाव येथे थांबताच महिलांनी या कारची तपासणी केली असता त्यात फिरकी कंपनीच्या देशी दारुच्या चार पेट्या आढळल्या. याची माहिती गावात पसरताच संपूर्ण महिला घटनास्थळी गोळा झाल्या. यामुळे गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर समितीच्या महिलांनी याची माहिती गोरेगाव पोलीस स्टेशन दिली. गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अवैध दारु विक्रेत्यासह वाहन व चार पेट्या दारुजप्त केली.याप्रकरणी गोरेगाव पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती.