पं.स.सदस्याची पाण्याच्या टाकीवरून वीरूगिरी
By Admin | Published: May 12, 2017 01:16 AM2017-05-12T01:16:30+5:302017-05-12T01:16:30+5:30
जिल्हा परिषद हायस्कूलच्या इमारत दुरुस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून चौकशीची तकार करूनही काहीच झाले नाही.
भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी : पोलिसांच्या मध्यस्थीनंतर उतरले खाली
लोकमत न्यूज नेटवर्क
एकोडी : जिल्हा परिषद हायस्कूलच्या इमारत दुरुस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून चौकशीची तकार करूनही काहीच झाले नाही. प्रकरणी दिलेल्या इशाऱ्यानुसार पंचायत समिती सदस्य जयप्रकाश बिसेन यांनी गावातील पाणी टाकीवर चढून विरूगिरी करीत उडी घेऊन जीव देण्याचा इशारा दिला. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.
येथील जुन्या जीर्ण इमारती करिता जि.प. बांधकाम विभागाकडून १५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला गेला असून या कामाच्या दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतकडे देण्यात आले. परंतु हे काम पूर्णत्वास आले असून या कामात मंजूर निकषाप्रमाणे काम न करता जुन्या इमारती मधला लाकूड फाटा मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आला असे पं.स. सदस्य बिसेन म्हणने आहे. लावण्यात आलेले लाकूड हा सन १९५५ मध्ये तयार करण्यात आलेल्या इमारतीचे असून हेच लाकूड दुरुस्तीनंतरही वापरण्यात आल्याचे निदर्शनास येते. या प्रकरणाची अनेकवेळा जिल्हा परिषद बांधकाम अभियंता शुक्ला व इतर अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र काम पूर्णत्वास येऊनही कोणत्याच प्रकारची चौकशी न करता देयक देण्याच्या तयारीला जि.प. बांधकाम विभाग लागला होता.
या कारणामुळे १९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, पंचायत समिती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशा अनेक ठिकाणी तक्रार करुन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणाची चौकशी न झाल्यास जि.प. शाळेच्या प्रांगणात असलेल्या पाणी टाकी वरुन उडी घेऊन जीव देण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ९ तारखेपर्यंत प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याचे पाहून बुधवारी (दि.१०) सकाळी ६ वाजताच्या सुमारास गंगाझरी पोलीसांना चकमा देत बिसेन यांनी मोठ्या पाणी टाकीवर चढाई केली. सकाळी ६ वाजताचे प्रकरण असताना ही हळूहळू लोकंची गर्दी वाढू लागली. हा सर्व प्रकार लक्षात घेता पोलिसांनी पं.स.सदस्याची मोठ्याने समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत या कामाची चौकशी व दोषींवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत पाणी टाकीवरून न उतरण्याचा हट्ट बिसेन यांनी धरला. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाला होकार देत पाणी टाकीवरुन उतरण्यास होकार दिला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिरोडा येथील प्रभारी उफ विभागीय पोलीस अधिकारी आर.एस. बरकते यांच्या मार्गदर्शनात गंगाझरी निरीक्षक सुनील उईके यांना योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून बिसेन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेला पोलीसच जबाबदार- अंबुले
पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे बिसेन पाणी टाकीवर जाऊन पोहचले. त्यामुळे घटनेला पोलीसच जबाबदार असल्याचे जि.प.सदस्य रमेश अंबुले यांनी सांगीतले. तर अभियंता शुक्ला यांनी पोलीसांसमक्ष दिलेल्या बयानात काम ग्रामपंचायत करीत असून कोणत्या कंत्राटदाराच्या माध्यमातून केले जात आहे याचे उत्तर देण्यास टाळले. काम जवळपास पूर्ण होत आले असून पूर्ण चौकशी झाल्यानंतरच दिलेलया अटी व शर्तीनुसार देयक काढण्यात येतील असे सांगीतले.